सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित : पंधरवडाभर उशीर होण्याची शक्यता
इंदूर (मध्यप्रदेश) : पाकिस्तानमधून पाच वर्षांपूर्वी भारतात परतलेली मूकबधीर युवती गीता आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी २ डिसेंबरपासून मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड तसेच शेजारी तेलंगणा राज्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी तिचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. तिच्याबरोबर येणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यप्रदेशच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त संचालक सुचिता तिर्की यांनी मंगळवारी सांगितले की, आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी गीता बुधवारपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होती. परंतु, तिच्यासोबत जाणारे सांकेतिक भाषा विशेषज्ज्ञ कोरोना संक्रमित झाल्याने हा दौरा आता पंधरवड्यासाठी लांबणीवर टाकला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून देशाच्या विविध भागांतील २० कुटुंबीयांनी गीता हीच आपली मुलगी असल्याचे सांगितलेले आहे. परंतु, या कोणत्याही कुटुंबाचा गीतावरील दावा सिद्ध होऊ शकलेला नाही. इंदूरमध्ये दिव्यांगांसाठी काम करणारी आनंद सर्व्हिस सोसायटी सध्या गीताची देखभाल करीत आहे. तिच्या कुटुुंबीयांना शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारने याच संस्थेवर सोपविलेली आहे.
या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गीता ही खाणाखुणा करून बालपणीच्या काही आठवणी सांगत आहे. त्यावरून ती मूळची मराठवाडा किंवा त्याला लागून असलेल्या तेलंगणामधील रहिवासी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती दोन दशकांपासून तिच्या कुटुंबीयांपासून दूर झाली होती.
गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.
देशाच्या तत्कालीन विदेशमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती २६ ऑक्टोबर रोजी भारतात परतू शकली होती. त्यानंतर ती इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करीत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.
.....................
गीताच्या कुटुंबीयांचा मराठवाड्यात शोध का?
सांकेतिक भाषातज्ज्ञांनी तिच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या असून, तिच्या बालपणीच्या आठवणी जागृत करीत आहेत. तिने खाणाखुणांद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गावाजवळ एक रेल्वेस्थानक आहे. गावाजवळ नदी असून, नदीच्या किनाऱ्यावर देवीचे एक मंदिर आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी नांदेड व शेजारी तेलंगणा राज्यात अशी काही ठिकाणे असून, तेथे गीताला घेऊन ते जाणार आहेत.
.........
पीएम- केअर्सचा पैसा कोठे गेला : ममता बॅनर्जी यांचा सवाल
कोलकाता : केंद्र सरकारने देशातील संघीय व्यवस्थेला धक्का पोहोचविल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला असून, पंतप्रधान नागरिक साहाय्य व आपत्कालीन मदत निधीतील (पीएम केअर्स) पैसा कोठे गेला, असा सवालही केला आहे. माझे सरकार केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या इच्छेनुसार काम करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पीएम केअर्स फंडाचा पैसा कोठे गेला? या निधीच्या भविष्याबाबत कोणाला माहिती आहे का? लाखो, करोडो रुपये कोठे गेले? याचे ऑडिट का? करण्यात आले नाही? केंद्र सरकार आम्हाला केवळ उपदेश करीता आहे. या सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी आम्हाला काय दिले, असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९४ जागांसाठी पुढील वर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनी दावा केला आहे की, राज्यातील कायदा-व्यवस्थेची स्थिती देशातील इतर राज्यांपेक्षा खूपच चांगली आहे.
उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्या म्हणाल्या की, कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवर भाजपला दुसरा कोणताही पक्ष साथ देत नाही. तरीही हा पक्ष अडून बसला आहे.
.................................
तृणमूल सरकारने सुरू केली द्वारे सरकार मोहीम
२०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारने द्वारे सरकार मोहीम सुरू केली आहे. राज्याच्या ११ सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. ती २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.
लोकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व पंचायती व नगरपालिकेच्या वॉर्डांमध्ये स्थापित २०,००० शिबिरांमध्ये रांगा लावल्या होत्या. दोन महिन्यांतील चार टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
ममतांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, राज्य सरकारच्या द्वारे सरकार पुढाकाराद्वारे लोकांना त्यांच्या दारापर्यंत सरकारी सेवा पोहोचवली जाईल. विविध शिबिरांमध्ये जोरात काम सुरू झाले आहे. लोकांनी याचा लाभ घ्यावा.
दरम्यान, लोकांच्या पैशावर तृणमूलने निवडणूक प्रचार मोहीम सुरू केली आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. १० वर्षे राज्यावर सत्ता गाजवल्यानंतरही या सरकारला अशा प्रकारची मोहीम राबवावी लागत आहे, यातच सर्व काही आले, असा टोलाही त्यांनी लगावला.
.........
चीनमध्येही मी टू : दोन वर्षांनी सुरू होणार सुनावणी
टीव्हीच्या होस्टने छळ केल्याचा आरोप : तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
तैपेई : झोउ जियाओजुआनला चीनच्या सरकारी टीव्हीमध्ये इंटर्नशीपचा अनुभव फारच वाईट आला. या काळात एका होस्टने छळ केला व या विरोधात आवाज उठविल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला.
झोऊने २०१८मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करून मी टू मोहिमेमध्ये सहभागी झाली होती. सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने तक्रार दाखल करून घेण्यासाठी मोठा दबाव आणला होता. याच्या सुनावणीसाठी दोन वर्षे तिने वाट पाहिली होती. या उलट कार्यक्रमाच्या होस्टने मानहानीचा खटला दाखल केला होता.
आता झोऊच्या प्रकरणात बुधवारी बिजींगच्या न्यायालयात सुनावणी सुरू होईल. चिनी महिला सर्व प्रकारचे दबाव झुगारून आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आता आवाज उठवित आहेत, हेच यातून दिसत आहे. झोऊने म्हटले आहे की, लैंगिक छळाचे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत, हेच यातून दिसून आले.
जागतिक स्तरावर मी टू मोहिमेने वेग घेतल्यानंतर चीनमध्येही महिलांना लैंगिक छळाच्या विरूद्ध आवाज उठविण्याचे बळ मिळाले. तथापि, ही मोहीम अशा वेळी सुरू झाली की, ज्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांचे सरकार हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत होते.
झोऊचे म्हणणे आहे की, २०१४ मध्ये सरकारी चॅनेल सीसीटीव्हीचे होस्ट झू यांनी ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला जबरदस्तीने धरले होते. त्याने झाल्याप्रकाराबाबत सार्वजनिकरीत्या माफी मागावी व ५०,००० युआनची भरपाई द्यावी, अशी मागणीही तिने केली होती.
........
रामायण क्रूज सेवा शरयू नदीत घडविणार रामचरितमानस यात्रा
अत्याधुनिक सुविधा : सुरक्षेकडेही काटेकोर लक्ष
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील शरयू नदीवर लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार असून, तिच्याद्वारे पर्यटकांना रामचरितमानस यात्रा घडविली जाणार आहे.
बंदरे, जहाज, जल वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी म्हटले आहे की, शरयू नदीवर पहिली लक्झरी क्रूज सेवा लवकरच सुरू होणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना कायम स्मरणात राहील असा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ही क्रूज सेवा लोकप्रिय घाटांवरून जाईल व यात्रेकरूंना अनोखा अनुभव देईल, असा प्रयत्न आहे. क्रूज सेवा सुरू करण्याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली.
या क्रूजवर सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा असतीलच, शिवाय अत्यावश्यक सुरक्षेचेही भान ठेवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार, ही सेवा देण्यात येईल.
..........................
अशी असेल क्रूज सेवा
१) संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या क्रूजमध्ये काचेच्या मोठ्या खिडक्या असतील. त्यातून भाविकांना घाटांची सुंदरता डोळ्यांत साठवून ठेवता येणार आहे.
२) क्रूजमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी स्वयंपाकघरही असणार आहे.
३) जैव शौचालयांची सुविधा.
४) क्रूज हायब्रिड इंजिनने सुसज्ज असेल. त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही.
५) एक ते सव्वातासात क्रूज १५ ते १६ किलोमीटरचा प्रवास.
६) क्रूजमध्ये रामचरितमानसवर आधारित एक व्हिडिओ दाखविला जाणार आहे. भगवान श्रीरामांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या कालखंडाची कथा त्याद्वारे दाखविण्यात येईल.
..........
कृषी कायद्यावरून भाजपवर मित्रपक्षांचा दबाव
शेतकऱ्यांना समर्थन; एनडीएतून बाहेर पडण्याचा इशारा
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविराेधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदाेलनावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर मित्रपक्षांचा दबाव वाढला आहे. शेतकऱ्यांसाेबत चर्चा करा; अन्यथा आम्ही वेगळे हाेताे, असा निर्वाणीचा इशारा काही पक्षांनी दिला आहे.
हरयाणा, पंजाब आणि राजस्थान या राज्यांतील शेतकऱ्यांचा आंदाेलनामध्ये सर्वाधिक सहभाग आहे. हरयाणातील सर्व खाप पंचायतींनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला हाेता. त्यानंतर दादरी येथील भाजप समर्थित अपक्ष आमदार साेमवीर संगवान यांनीही पशुधन मंडळाचा राजीनामा दिला. तेदेखील आंदाेलनात सहभागी झाले आहेत. महिनाभरापूर्वीच त्यांची या पदावर निवड झाली हाेती. राजीनामा म्हणजे मनाेहरलाल खट्टर सरकारचा पाठिंबा काढला का? या प्रश्नावर संगवान यांनी प्रतिक्रिया टाळली. हरयाणामध्ये भाजप आणि जेजेपी पक्षांची युती आहे.
दुसरीकडे राजस्थानमध्येही असेच चित्र आहे. राष्ट्रीय लाेकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनीवाल यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून ‘एनडीए’ला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा दिला आहे. शेतकरी आणि सैनिक हे पक्षाचे बलस्थान असल्याचे बेनीवाल म्हणाले. बेनीवाल यांनी गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली हाेती, तर मुष्टीयाेद्धा विजेंदर सिंह यानेही बेनीवाल यांना शेतकऱ्यांना समर्थन देण्याची विनंती केली हाेती.
संगवान यांनी किंवा बेनीवाल यांच्या पक्षाने फारकत घेतल्यास एनडीएवर माेठा परिणाम हाेणार नाही; परंतु काँग्रेस अथवा इतर विराेधकांचा याचा लाभ हाेऊ शकताे.
---------------------
सरकारी संकेतस्थळ, पोर्टलची नक्कल
करून लोकांची होतेय फसवणूक
सरकारी संकेतस्थळ, पोर्टलची नक्कल करून लोकांची होतेय फसवणूक
-----------------------
ई-कॉमर्स पोर्टल ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''जेम'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' च्या नावावर कमाई सुरू
नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊन असताना बनावट संकेतस्थळांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक सुरूच आहे. ही टोळी सरकारी संकेतस्थळांची नक्कल करण्यातही मागे नाही. ताजी घटना सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘जेम’ बाबत आहे.
गृहमंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाने जेम पोर्टलचा वापर करणाऱ्यांना म्हटले की, फसवणूक टाळण्यासाठी इतर कोणत्याही माध्यमाकडे न जाता अस्सल पोर्टलवर जाऊन आपले पंजीकरण करावे.
‘लोकमत’ ला मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी जेम पोर्टलशी मिळतेजुळते डोमेन व रंग तसेच डिझाईनवाले पोर्टल बनवून नोकरदार आणि ग्राहकांना त्याच्यावर नोंदणी करण्यासाठी ई-मेल पाठवत आहेत. विभागाचा अधिकारी म्हणाला की, जेम पोर्टलचे नाव घेऊन पाठविले जात असलेल्या ई-मेलमध्ये बनावट संकेतस्थळांची लिंक दिले जाते. ती पाहताच अस्सल वाटते. ज्याने त्या लिंकवर क्लिक करताच त्याच्यासमोर साइन-अप फॉर्म खुला होतो. येथे युजरकडून पंजीकरणासाठी शुल्कही मागितले जाते. युजरने ते पैसे पाठविले तर त्याची फसवणूक होते. याबाबत गृहमंत्रालयाच्या सायबर सुरक्षा सेलच्या सूत्रांनुसार सरकारी ई मार्केटप्लेस जेमच्या नावाने अनेक बनावट संकेतस्थळ सक्रिय आहेत.
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''जेम'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''' वर नोंदणी विनाशुल्क
साइबर सुरक्षा सेलचे म्हणणे असे की, सरकारी प्लॅटफॉर्मवर नोंदणीसाठी विक्रेता व ग्राहकाकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. त्यामुळे नोंदणी थेट जेम पोर्टलवर जाऊन केली पाहिजे.
सायबर सेलकडून लॉटरी जिंकणे, सरकारी विभागात नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या बनावट ई-मेल आणि सणांच्या दिवसांत जास्त सूट मिळेल, अशी ऑफर दाखवून लोकांना फसविण्यासाठी बनावट संकेतस्थळ, ई-मलेपासून सावध राहण्याचा इशारा दिला गेला आहे.
पॅन कार्ड बनविण्याच्या नावावर अनेक बनावट संकेतस्थळे चालविली गेली. त्या माध्यमातून लोकांकडून पैशांसोबत त्यांचा आधारकार्ड क्रमांक व इतर माहिती मिळविण्याचे प्रकरणही उघड झाले आहेत. त्यामुळे सरकारने याबद्दल सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.
------------------------
मथुरेत कोर्टाचे काम आज बंद
मथुरा : मथुरा बार असोसिएशनने पुकारलेल्या बंदमुळे येथील कोर्टाचे काम बुधवारी बंद राहणार आहे. मोटार अपघात दावे लवाद न्यायालय मुख्य न्यायालयापासून दूर एका खाजगी इमारतीत हलविण्यात येणार आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे.
विवाहातील गोळीबारात बालक जखमी
गोरखपूर : विवाहातील आनंदाप्रित्यर्थ करण्यात आलेल्या गोळीबारात चार वर्षीय बालक जखमी झाले आहे. त्याला उपचारासाठी लखनौ येथे नेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरच गजाआड करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.
रूपनगर आमदाराची आपमध्ये वापसी
चंडीगढ : रूपनगरचे आमदार अमरजित सिंह संदोआ यांनी पंजाबमधील सत्तारूढ काँग्रेसमध्ये दीड वर्ष राहिल्यानंतर मंगळवारी आपमध्ये वापसी केली. आपच्या नेतृत्वाच्या वागणुकीमुळे माझा अपेक्षाभंग झाला, असे आरोप करीत त्यांनी तो पक्ष सोडला होता. आता माफी मागत त्यांनी पुन्हा आपमध्ये प्रवेश केला.
मास्क न घातलेल्या ६७२ जणांवर कारवाई
नोएडा : उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून विना मास्क फिरणाऱ्या ६७२ लोकांवर कारवाई करण्यात आली. लोकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.
..........
कॅनडाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य अपुऱ्या माहितीवर आधारित
केंद्र सरकारची टीका; शेतकरी आंदोलनाबाबत व्यक्त केली चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्यांना शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचे सत्र अवलंबले असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या वादात उडी घेतली आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाविषयी आम्हाला चिंता वाटत असून शांततेच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनाला आमचे कायमच समर्थन राहील, असे वक्तव्य ट्रुडो यांनी केले. त्यावर भारताने प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्रुडो यांनी अपुऱ्या माहितीवर आधारित वक्तव्ये करू नयेत, असे सुनावले आहे.
गुरुनानक जयंतीनिमित्ताने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात पंजाबातील नेते तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधताना ट्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाविषयी चिंता व्यक्त केली. आमच्या देशात अनेक शीख बांधव राहतात. त्यांचे अनेक नातेवाईक पंजाबात असून त्यांना आंदोलनाविषयी चिंता वाटत असल्याचे मत ट्रुडो यांनी व्यक्त केले. कॅनडाचे भारतीय वंशाचे संरक्षणमंत्री हरजीत सज्जन यांनीही शेतकरी आंदोलनाविषयी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, ट्रुडो यांचे वक्तव्य अपुऱ्या माहितीवर आधारलेले असून लोकशाही देशाच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करणे आंतरराष्ट्रीय संकेतांचे भंग करणारे आहे, अशी टीका केंद्र सरकारने केली आहे. कॅनडाने आमच्या देशांतर्गत प्रश्नावर बोलू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
...........