करमाड : जालना रोडवरील ग्रामपंचायतीच्या शॉपिंग काँप्लेक्सच्या बाजूला रविवारी दुपारी जवळपास ३० जिलेटिन कांड्या सापडल्या आहेत. त्या जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
जालना रोड ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मार्गावर ग्रामपंचायतीच्या वतीने पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पेव्हर ब्लॉकचे काम सुरु असताना शाळेलगत ग्रामपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूला पेव्हर ब्लॉकसाठी वापरण्यात येणाऱ्या खडीचा कच होता. त्यात बांधलेल्या जवळपास ३० जिलेटिनच्या कांड्या मजुराला सापडल्या.
मजुराने बाजूला असलेले दुकानदार वसंत खांडेभराड यांना माहिती दिली. सरपंच दत्तात्रय उकर्डे व लालाजी उकर्डे यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक अजिनाथ रायकर यांना दिली.
त्यानंतर पोलीस कर्मचारी सचिन राठोड, श्रीकृष्ण दाणी,अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी जात त्या कांड्या ताब्यात घेतल्या. दरम्यान, पोलीस निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी या स्फोटकांबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.