औरंगाबाद : शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना एकवटली असली तरी सामान्य शिवसैनिकांच्या मनातील खदखद कायम आहे. त्या खदखदीला उपजिल्हाप्रमुख जयवंत (बंडू) ओक यांनी सोमवारी वाचा फोडत सत्ता नेत्यांच्या वंशावळीला व सामान्य शिवसैनिक अडगळीला पडल्याची खंत व्यक्त केली.
पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात ओक म्हणाले, ‘शिवसैनिक कोणत्याही अपेक्षा न ठेवता या आमदारांना तीन-तीनवेळा निवडून आणतात आणि ते बंडखोरी करतात. आमदार असो, वा नगरसेवक; त्यांना दोनच टर्म ठरवून द्या. जो काम करतो, त्यांना संधी द्या. नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांकडेही पाहिले पाहिजे.
जवाहर कॉलनी रोडवरील एका सभागृहात गद्दार आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, ऋषी खैरे, विजय वाघचौरे, हनुमान शिंदे, अनिल पोलकर, सुशील खेडकर आदींची उपस्थिती होती.
बंडखोरांची ईडीने चौकशी करावी- खैरेबंडखोर आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. आता ईडीने याबाबतही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते खैरे यांनी केली. ३८३ कोटी रुपयांच्या बीड बायपासच्या रस्त्यात सात कोटी रुपये आ. शिरसाट यांनी घेतल्याचे कंत्राटदाराकडून समजले आहे. जैस्वालांनी पैसे घेऊन गद्दारी केली आहे. त्या दाढीकडे (एकनाथ शिंदे) एवढे पैसे कुठून आले, याची ईडीने चौकशी करावी.
पक्षप्रमुखांना पत्र देण्याचे शहाणपण : दानवेपक्षप्रमुखांना पत्र देण्यापर्यंत आ. शिरसाट शहाणे झाले आहेत. ८ जूनच्या सभेत भाषण न करू दिल्याने नाराज झाले म्हणे. पक्षसभेचा कार्यक्रम कुठे ठरतो, हे त्यांना माहिती नाही काय, असा सवाल करत आ. दानवे यांनी शिरसाट यांच्या पत्राची चिरफाड करत त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन केले.
२९ जूनला बंडखोरांविरोधात रॅली२९ रोजी बंडखोरांविरोधात शिवसेना रॅली काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी सांगितले. शहरात तीन बंडखोर आमदारांची कार्यालये आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयांसमोर रॅली जाईल. त्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याचा उद्देश नाही. सिल्लोडमध्ये सत्तातरांविरोधात रॅली काढण्यात येईल, असे आ. दानवे म्हणाले.
उद्रेकाचा सामना करावा लागेल : घोसाळकरआ.शिरसाटांचा कारभार एकट्यापुरताच सुरू होता. हे बंडखोर ज्या दिवशी शहरात येतील, त्या दिवशी उद्रेकाचा सामना त्यांना करावा लागेल. त्या बंडखोरांना येथे गाडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असे संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणाले.