औरंगाबाद: दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी आज औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी केली. मुंबई येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पार्किंग परिसरातून मालधक्का परिसराकडे जाणाऱ्या दादऱ्याची पाहणी केली. यावेळी या पुलावरील उखडलेले फरशा पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले.
गजानन माल्या यांनी रेल्वेस्टेशनवरील पार्किंग, मालधक्का, आरक्षण विभाग, वेटिंग रूमसह विविध भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनाबरोबर संवाद साधून मागण्या जाणून घेतल्या. त्यावेळी रेल्वेस्टेशनरील कुलीनीही त्यांना निवेदन दिले . रेल्वेस्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंदकुमार शर्मा, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप साबळे, रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमानी, अनंत बोरकर, गौतम नहाटा, राजकुमार सोमानी आदी उपस्थित होते.