औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचा १२ डिसेंबर रोजी नगरसोल ते परभणीदरम्यान वार्षिक पाहणी दौरा आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ११० मिनिटांचा दौरा असणार आहे. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यातून मराठवाड्यातील रेल्वेसंदर्भात प्रश्न सुटणार की, पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले जातील, याकडे प्रवाशांसह प्रवासी संघटनांचे लक्ष लागून आहे.
‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा बुधवारी नगरसोल येथून पाहणी दौरा सुरू होईल. नगरसोल, तारूर, रोटेगाव, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळमार्गे दुपारी १२.१० वाजता औरंगाबाद स्थानकावर महाव्यवस्थापक पोहोचतील. पाहणी दौऱ्यात सर्वाधिक वेळ हा औरंगाबाद स्थानकाला देण्यात आला आहे. याठिकाणी गँगमन टूल रूमचे उद््घाटन, ट्रॅकमन्सला टूल कीटचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर स्थानकाची पाहणी केली जाईल. रेल्वे कॉलनीच्या पाहणीनंतर महाव्यवस्थापक प्रवासी, नागरिकांबरोबर संवाद साधणार आहेत. औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून दुपारी २ वाजता विनोदकुमार यादव चिकलठाणा, करमाड, बदनापूरच्या दिशेने मार्गस्थ होतील. त्यानंतर जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील विविध कामे करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही त्रुटी निघणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे.
अनेक प्रश्न रेंगाळलेलेरेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, मुंबई, दिल्लीसह विविध शहरांसाठी नव्या रेल्वे सोडणे, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडणे, औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा यासह मराठवाड्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळले आहेत. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामुळे हे प्रश्न सुटणार आहेत, की केवळ पाहणीचे सोपस्कार पूर्ण केले जातील, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.