औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेचे पुनरुज्जीवन करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सोमवारी २७ रोजी तहकूब सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे़. या सभेत मोजकेच बोला, तसेच ज्या नगरसेवकांना बोलावयाचे आहे, त्यांची नावे आधी द्या, असे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिले आहे.
गुरुवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंमध्ये मुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत तात्काळ निर्णय घ्या, असे आदेश दिले आहेत़ त्यामुळे २७ रोजी होणाऱ्या सभेत योजनेवर मत मांडणाऱ्या नगरसेवकांची नावे आधी द्यावीत, असे पत्र महापौरांनी गटनेत्यांना दिले आहे़
योजनेबाबत ११ जुलै रोजी सर्वसाधारण सभेसमोर ऐनवेळी प्रस्ताव ठेवण्यात आला होता़ त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार २४ जुलैला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. २४ जुलैची सभा तहकूब झाली़ नंतर ६ आॅगस्टला आयोजित सभेत कचराकोंडी, दूषित पाण्यावर चर्चा झाल्याने आयुक्त निघून गेले. नंतर ११ आॅगस्ट रोजी तहकूब सभा बोलावण्यात आली़ आयुक्त दिल्ली दौऱ्यावर गेल्याने १७ आॅगस्ट रोजी सभा आयोजित केली़ त्या सभेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली. आता सोमवारी योजनेवर सभागृहात चर्चा होणार आहे.