औरंगाबाद : रखरखत्या उन्हात रिक्षा चालविताना आपल्या बाबाला होणाऱ्या त्रासाने कावलेल्या शाळकरी मुलाची जिज्ञासा बाबाच्या रिक्षात एअर कोल्ड यंत्रणा (एसी) बसवूनच शांत झाली. ही यंत्रणा फक्त त्याचे चालक बाबा यांनाच उपयोगी पडते असे नव्हे, तर एसी टॅक्सी न परवडणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा देत आहे.
इयत्ता नवव्या वर्गात शिकणाऱ्या अयान मिर्झा बेग (१५) याने वडील मजहर मिर्झा यांच्या आॅटो रिक्षात ही एसी यंत्रणा बसविली. तीव्र उन्हाळा व त्यात उष्णतेची लाट आलेली असताना रिक्षा चालविणे किंवा त्यातून प्रवास करणे सुखकारक नसतेच. सतत रिक्षा चालविताना वडिलांना होणाऱ्या त्रासाने लहानगा अयान बेचैन होत होता. या त्रासातून वडिलांची मुक्तता कशी करता येईल, हाच विचार त्याच्या डोक्यात सतत फिरे. त्यातून रिक्षात एसी बसविण्याचे त्याने ठरविले. मेकॅनिक्सच्या कामाचे सूक्ष्म निरीक्षण, ऑनलाईन व्हिडिओ व शाळेतील प्रोजेक्टमधून माहिती घेत त्याने एसी तयार करण्याचे तंत्र अवगत केले.
अयान सांगतो, ‘‘मी रविवारच्या आठवडी बाजारात गेलो, तेथून १२ व्होल्टच्या पंख्याच्या तीन मोटारी, तीन पंखे, पाणी खेचण्यासाठी अन्य एक १२ व्होल्टची मोटार, एक टाकी, प्लास्टिक पाईप आणि फोमची मॅट विकत घेतली. मागील वर्षभर मी यावर काम करीत होतो. अभ्यासातून वेळ मिळाला की, एसीसाठी डिझाईन तयार करायचो. वर्षभरात ते तयार झाले व मी ते रिक्षात बसविलेही.
पंखे चालकाच्या समोर रिक्षाच्या टपाखाली बसविले आहेत. प्रवासी आसनामागील जागेत टाकी बसवून त्यातून पीव्हीसी पाईपने फॅन चेंबरला जोडले आहे. या टाकीतून थंड हवा फॅन चेंबरमध्ये जाते. पंखे सुरू झाले की थंड हवा सुरू होते. रिक्षाचे टप (छत) फोमने आच्छादित केले असून, सर्व यंत्रणा लोकरीच्या मॅटने झाकून टाकली आहे. हे सर्व साहित्य खरेदीसाठी केवळ १५०० रुपये खर्च आल्याचे अयान सांगतो.
मझहर यांनी सांगितले की, ही यंत्रणा रिक्षातील बॅटरीवर चालते; परंतु त्याचा रिक्षाचा वेग व पेट्रोल जळण्यावर काहीच फरक पडत नाही. माझ्या प्रवासी ग्राहकांनाही या सुविधेचा फायदा होत असल्याने ते आनंदी होतात, असे सांगून मझहर म्हणाले, रिक्षात करण्यात आलेले सुधारणाविषयक बदल आरटीओच्या नियमानुसारच आहेत.