छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एक वेगळी बाब घडली. निवडणुकीच्या मैदानात असलेले महायुतीचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांना जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील पाचोड येथील मतदान केंद्रावर मतदान करावे लागले. भुमरे जरी औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार असले, तरी त्यांचे मतदान मात्र जालना लोकसभा मतदारसंघात असल्यामुळे त्यांची अशी भाैगोलिक कोंडी झाली.
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे तालुके जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. भुमरे यांचे मतदान पैठण तालुक्यातील पाचोड येथील जि.प. शाळेतील मतदान केंद्रावर होते. त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क तेथे बजावला.
कुणी कुठे केले मतदान...?- महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे व कुटुंबाने औरंगपुरा येथे सहपरिवार मतदान केले.- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे सहकुटुंब मतदान केले.- खा. इम्तियाज जलील यांनी गोदावरी पब्लिक स्कूल, एन-१२ येथे सहकुटुंब मतदान केले.- ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी धर्मवीर संभाजी विद्यालय, एन-५ येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजबनगर येथील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदान केले.- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सहकुटुंब शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय येथे मतदान केले.- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी कोटला कॉलनीतील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदान केले.