- स.सो. खंडाळकर
चिकलठाण्याचं ते जुनं विमानतळ... आता इतकं अद्ययावत असण्याचं कारण नव्हतं. वर्ष नेमकं आठवत नाही. कदातिच ते केंद्रीय मंत्रीही असावेत. विमानातून उतरून चालू लागले, तर त्यांच्या खांद्यावर एक गाठोडं. शहरात कामगार क्षेत्रात काम करणारी मोजकीच मंडळी त्यांना घ्यायला आलेली. दिवंगत अॅड. प्रवीण वाघ व आणखी काही कार्यकर्ते... स्वत:चं साहित्य स्वत: खांद्यावर घेऊन चालणारे ते जॉर्ज फर्नांडिस होत... एक मोठे कामगार नेते होत... यावर त्यावेळी तर विश्वासच बसत नव्हता.
जॉर्ज फर्नांडिस यांची राहणी किती साधी होती, हे सांगण्याची गरज नाही. खादीचा शर्ट आणि पायजमा... ते स्वत: कपडे धुवायचे... मंत्री असतानाही संरक्षण नाकारलं... आता असा एक मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती. स्वत:चे कपडे स्वत: धुणारा पुढारी तर विरळाच... मंत्री तर सापडणारच नाही.
लोकमतचे दिवंगत संपादक म.य. ऊर्फ बाबा दळवी आणि जॉर्ज फर्नांडिस यांची खास मैत्री. ती मुंबईपासूनची. पुढे बाबा दळवी औरंगाबादला आले. नागपूरला गेले आणि पुन्हा औरंगाबादला आले, तरी टिकून राहिलेली. बाबा दळवी यांच्या तोंडून नेहमी जॉर्ज फर्नांडिस यांचं नाव यायचं. मराठवाडा विकास आंदोलनात पोलिसांच्या लाठीमारात बाबा जखमी झाले होते, तर त्यावेळी मोबाईल, व्हॉटस्अॅप, फेसबुक किंवा अन्य सामाजिक माध्यमे नव्हती; पण तार करून बाबांच्या प्रकृतीची चौकशी करणारे ते जॉर्ज फर्नांडिस होते.
पुढे बाबा दळवी नागपूरला गेले. तेथील ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक पदाची धुरा ते सांभाळीत होते. आणीबाणी हटल्यानंतर देशात सत्ताबदल झाला. जॉर्ज फर्नांडिस हे सतत गाजत होते. केंद्रात ते मंत्री बनले व एका कार्यक्रमानिमित्त नागपूरला आले होते. त्या कार्यक्रमाला बाबा दळवीही गेले होते. त्यांना पाहिल्याबरोबर जॉर्ज फर्नांडिस हे स्वत: खाली आले आणि त्या दोघांनी एकमेकाला आलिंगन दिले. एक तर समाजवादी विचारांचा दोघांमधला समान धागा आणि मंत्री बनल्याने डोक्यात हवा जाण्याची शक्यता नव्हती.
औरंगाबादेत हिंद मजदूर सभेच्या माध्यमातून काम करणारी दिवंगत अॅड. प्रवीण वाघ, साथी सुभाष लोमटे ही मंडळी जॉर्ज फर्नांडिस यांना फॉलो करीत असत. औरंगाबादला त्यांचे सातत्याने येणे-जाणे नव्हते; परंतु देशभरातील कामगारांप्रमाणे ते औरंगाबादच्या कामगारांचेही नेते होते. त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा इथल्या कामगारांच्या मनातही होताच...