औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उपचार क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी, वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त खाटा उपलब्ध ठेवाव्यात, कोरोनाच्या रुग्णांचे व्यवस्थापन चोखरित्या करावे, तसेच उपचार घेऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांकडून फिडबॅक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी केल्या.
चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील उपलब्ध उपचार सुविधांचा आढावा घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. कमलाकर मुदखेडकर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांची उपस्थिती होती. रुग्ण दाखल करताना एसओपीनुसार त्या रुग्णास कोणत्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे, हे वैद्यकीयरित्या तपासून त्या पद्धतीने सहकार्य करावे. लक्षणे नसलेले तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांना सीसीसीमध्ये पाठवून, उपचारांची जास्त गरज असलेल्या रुग्णांसाठी मिनी घाटीतील खाटा उपलब्ध होतील, याची खबरदारी घ्यावी. एकूण खाटा, आयसीयु खाटा, रिक्त खाटा याबाबतची अद्ययावत माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी. जे रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी कालावधित बरे होतील, त्यांना गरजेनुसार राज्य कामगार आरोग्य केंद्रात, सीसीसीमध्ये पाठवावे. कोरोना रुग्णांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना बोलण्याची सुविधा उपलब्ध ठेवावी.
स्वामी विवेकानंदनगर, मुकुंदवाडीत भूमिपूजन
औरंगाबाद : स्वामी विवेकानंद प्रभागात आ. अंबादास दानवे यांनी दिलेल्या १५ लाख रुपये निधीतून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजन आ. प्रदीप जैस्वाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. दानवे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गोपाल कुलकर्णी, गणपत खरात, सुरेश कर्डिले, मोहन मेघावाले, किशोर नागरे यांची उपस्थिती होती. तसेच ज्ञानेश्वर कॉलनी मुकुंदवाडी येथे २५ लाख रुपयांतून होणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, बन्सीलाल गांगवे, दामोधर शिंदे, मनोज गांगवे, सदाशिव पपुलवाड, मनोज बोरा, ज्ञानेश्वर डांगे आदींची यावेळी उपस्थिती होती.
३० मार्च ते ३ एप्रिलदरम्यान व्यवहार बंद
औरंगाबाद : पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारात ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधित पुस्तके, कागदाची भांडार स्तरावर साठा मोजणी होणार आहे. त्यामुळे मंडळाचे औरंगाबाद, लातूरसह उर्वरित सर्व विभागीय ठिकाणांचे व्यवहार बंद राहतील, असे भांडार व्यवस्थापक व्ही. एल. पडघान यांनी कळविले आहे.