सिल्लोड : येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनात 'पैसे घ्या पण विहिरी मंजूर करा' असे अनोखे आंदोलन महाराष्ट्र क्रांती मोर्चाच्यावतीने आज दुपारी करण्यात आले.
राज्यशासनाने सिल्लोड तालुका दुष्काळ सदृश तालुका म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे आता रोजगार हमीचे कामांना जोर येणार आहे. त्यातच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी वैयक्तिक सिंचन विहीरचे प्रस्ताव मंजूर करून त्यातून रोजगारांना काम उपलब्ध करून दिले जाते.मात्र, सिल्लोड तालुक्यातील वैयक्तिक सिंचन विहिरीचे गेल्या ३ महिन्यापासून प्रस्ताव प्रलंबित आहेत. महाराष्ट्र क्रांती मोर्चा सिल्लोड तालुक्याच्यावतीने पंचायत समितीच्या गेटपासून गटविकास अधिकारी यांच्या दालनात डफ वाजवत ताटामध्ये चिल्लर पैसे टाकून 'पैसे घ्या, विहिरी मंजूर करा' असे अनोखे आंदोलन करण्यात आले. बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, विहिर आमच्या हक्काची ...नाही कोणाच्या बापाची, काम करा, नाहीतर खुर्च्या खाली करा ; अशा घोषणांनी पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता. ३ दिवसात रखडलेली कामे मंजूर न केल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाचा ताबा घेऊ असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिल.
आंदोलनात मारोती वराडे, सुनील सनान्से,सोमिनाथ कळम,दत्ता पांढरे, प्रवीण मिरकर, दिलीप कळम, लक्ष्मण मुरकुटे, युवराज वराडे, दादाराव समीद्रे, अक्षय मगर, नितीन शिनगारे, सुनील पांढरे, बालाजी काकडे, भगवान दळवी, प्रसाद वराडे, संपत वराडे, संतोष काकडे, गणेश काकडे यांच्यासह शेतकरी, कामगार आदींचा सहभाग होता.
कामे पूर्ण झाल्यावर नवीन प्रस्ताव मंजूर केले जातीलअनेक गावांतील प्रस्ताव मंजूर झाले आहेत.मात्र त्यातील अनेक विहिरी अजून पूर्ण झाल्या नाहीत. अपूर्ण कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल. आम्ही पैसे मागितले नाही, हे आंदोलन स्टंट बाजी आहे.- दादाराव आहिरे, गटविकास अधिकारी, सिल्लोड