औरंगाबाद : आॅईल कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची धमकी देत कैसर कॉलनीतील कलीम कुरेशी याच्याकडून दर महिन्याला एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, खंडणी घेण्यासाठी आलेल्या एनजीओला बेदम मारहाण करून दोघांना जिन्सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर यातील दोन जण फरार झाले. खंडणी घेण्यासाठी सुटाबुटात आलेले हे चौघे मोंढ्यातील हमाल आहेत.कैसर कॉलनीतील कलीम छोटू कुरेशी याची वरूड काझी गावात के.के. लुब्रिकेटस् नावाची आॅईल कंपनी आहे. नारेगावातील इरफान हारुण शहा याने कलीम कुरेशी यांना कंपनी चालवायची असेल, तर दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. खंडणी न दिल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळात तक्रार करून उपोषणाला बसेल आणि कंपनी बंद पाडेल, अशी मोबाईलवर धमकी दिली. धमकीचा फोन कंपनीचे व्यवस्थापक समीर चाऊश यांनाही येत होता. सतत खंडणीची मागणी करीत असल्याने समीर चाऊश यांनी इरफान व त्याच्या साथीदारांना कैसर कॉलनीतील कलीम कुरेशी यांच्या घरी बोलावले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता इरफान कलीम कुरेशी यांच्या घरी आला. एक लाख रुपयांची मागणी करताच कलीम कुरैशी यांच्या साथीदारांनी इरफानसह शेख रशीद महेमूद या दोघांना बेदम मारहाण करीत जिन्सी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेताच शेख अथहर व त्याचा साथीदार पळून गेले. याप्रकरणी कलीम कुरेशी यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फौजदार दत्ता शेळके तपास करीत आहेत.हमालांना बनविले अधिकारीनारेगावातील इरफान शहा याने मोंढ्यातील चार हमालांना हाताशी धरून त्यांना सफारी सूट घेऊन दिला होता. सुटाबुटात ते कंपनीत जाऊन मालकांना धमकी देत खंडणी उकळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी चौघे एका सुमोमध्ये आले आणि कलीम कुरेशी यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याने बिंग फुटले.गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताकारखान्यातील धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास होत असून, कंपनी चालू ठेवणायची असेल, तर दर महिन्याला १ लाख रुपये द्यावेच लागतील, असा तगादा लावला होता. १ लाख घेण्यासाठी ही मंडळी सुटाबुटात आली; परंतु त्यांच्या वागण्यावरून त्यांचे पितळ उघडे पडले. २ जणांना अटक केली असून, आरोपींनी शहरात अजून कुणाला ठगवून पैसे उकळले आहेत का, याचा शोध जिन्सी पोलीस घेत आहेत.
खंडणी घेण्यासाठी औरंगाबादच्या मोंढ्यातील हमाल सुटाबुटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 11:55 PM
आॅईल कंपनीविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची धमकी देत कैसर कॉलनीतील कलीम कुरेशी याच्याकडून दर महिन्याला एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
ठळक मुद्देदोन अटक : जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल