लातूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी लागणार आहे. सकाळी ७ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याने प्रशासनाच्या वतीने मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्ट्राँगरुमवर सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तर मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा फौजफाटा तयार आहे. शिवाय, मतमोजणी केंद्रासमोरील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी सकाळी ७ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह १०५२ पोलिस कर्मचारी व दोन सीमा सुरक्षा बलाच्या तुकड्या, राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात निवडणूक विभागाने दिलेल्या ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे. शिवाय, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही बंदी आहे.लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. अहमदपूरची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदपूर, उदगीर मतदारसंघाची औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीर, औसा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औसा शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, निलंगा मतदारसंघाची मतमोजणी निलंगा शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 19, 2014 12:16 AM