औरंगाबाद : आपले गणेश मंडळाचे सर्वात्कृष्ट लेझीम, पावली, ढोल पथक ठरावे यासाठी मागील महिनाभरापासून कार्यकर्ते सराव करीत आहेत. ही मेहनत खऱ्या अर्थाने सोमवार, दि.८ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन मिरवणुकीत रंगत आणणार आहे. या पथकांना प्रोत्साहन मिळावे, पुढील वर्षी खेळण्याची नवऊर्जा मिळावी यासाठी लोकमतने सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरात औरंगपुरा, सिडको- हडको व गारखेडा अशा तीन भागांत श्री विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत विविध मंडळांचे लेझीम पथक, पावली पथक व ढोल पथक सहभागी होणार आहेत. आमचे तज्ज्ञ परीक्षक सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान सिटीचौक, टी.व्ही. सेंटर व गजानन महाराज मंदिर परिसरात फिरून परीक्षण करणार आहेत. यात सर्वोत्कृष्ट संघाला बक्षीस देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातून सर्वोत्तम लेझीम, पावली खेळणाऱ्या पथकाला प्रथम, द्वितीय, तृतीय, असे क्रमांक तसेच सर्वोत्तम ढोल वाजविणाऱ्या पथकामधूनही प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत. सर्व बक्षीस एका भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहेत, तर मग सज्ज व्हा, बक्षीस जिंकण्यासाठी आणि श्री विसर्जन मिरवणुकीत शहराला दाखवून द्या आपली सर्वोत्कृष्ट खेळी.
गणेश मंडळांनो बक्षीस जिंकण्यासाठी सज्ज व्हा
By admin | Published: September 07, 2014 12:49 AM