नांदेड : मराठवाडा जनता विकास परिषद शाखा नांदेड, परिवर्तन प्रतिष्ठा आणि मराठवाडा समन्वय समिती या स्वयंसेवी संघटनाच्या वतीने मुखेड व कंधार तालुक्यातील निवडक गावांचा दुष्काळी पाहणी दौरा करण्यात आला़ या गावातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेची कामे शासनाने त्वरित सुरु करावीत, अशी एकमुखी मागणी या पथकाकडे केली आहे़मुखेड तालुक्यातील उमरदरी, बोमनाळी, होलगरवाड, कबनूर आणि चव्हाणवाड व कंधार तालुक्यातील खंडगाव या गावांना भेटी देवून तेथील शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांशी दुष्काळाबाबत चर्चा करण्यात आली़ मुखेड तालुक्यातील झालेल्या भ्रष्टाचारामुळे व कर्मचाऱ्यांच्या असहकार्यामुळे शासकीय यंत्रणेकडून मागणी करुनही कामे हाती घेण्यात आली नाहीत़ त्यामुळे मजुरीसाठी अनेकांना गाव सोडावे लागले़ अनेक गावांत जॉब कार्डधारकांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे नमुना ४ भरुन देवून काम मागितले, परंतु त्यावर शासकीय यंत्रणेकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही़ अनेक गावांत कमी क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ गावाची लोकसंख्या पाहता टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे़ पाणी साठवणुकीचे हौद अपुरे असल्यामुळे पशूधनाची परवड होत आहे़ दुष्काळी भागात रोजगार हमी योजना, मृद संधारण विकास, नाला सरळीकरण यासारखी कामे त्वरित सुरु करुन मागेल त्यास काम उपलब्ध करुन द्यावे, जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात अशी मागणी पाहणी दौऱ्यात दुष्काळग्रस्तांनी केली़ या पाहणी दौऱ्यात डॉ़ व्यंकटेश काब्दे, बळवंत मोरे, भाऊराव मोरे, डॉ़हिमगिरे, वडजे, दत्ता तुमवाड, परिवर्तन प्रतिष्ठानचे प्रा़ डॉ़ अशोक सिद्धेवाड, प्रा़डॉ़लक्ष्मण शिंदे, सूर्यकांत वाणी यांचा सहभाग होता़
रोहयोच्या कामांना त्वरित प्रारंभ करा
By admin | Published: March 16, 2016 8:29 AM