छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात येतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार मोबाइल नंबरवर मिस काॅल देताच मोबाइल अर्ज प्राप्त करून घेता येत आहे.
उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून मिळते मदतवैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी दिला जातो. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते.
वार्षिक उत्पन्न १.६० लाख हवेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी वार्षिक उत्पन्न १.६० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. रुग्णाचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी या मोबाइलवर द्या मिस कॉलमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी अर्ज करण्यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस कॉल देताच एका लिंकचा मेसेज येतो आणि त्याद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपलब्ध करून दिला जातो.
दररोज ५०० जणांचे काॅलया क्रमांकावर दररोज सुमारे ५०० जणांचे काॅल येतात. अर्ज केल्यानंतर प्रत्येक रुग्णाला हवी असलेली मदत मिळेल, यादृष्टीने प्रयत्न केला जातो.
मदतीचा हातसंबंधित मोबाइल नंबरवर मिस काॅल दिल्यानंतर लिंक येते. या लिंकद्वारे अर्ज प्राप्त करता येतो. डिसेंबर २०२२ पासून याची सुरुवात झाली आहे. दररोज जवळपास ५०० जणांचे काॅल येतात. सर्वांना मदतीचा हात दिला जातो.- मंगेश चिवटे, मूळ संकल्पना व कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष.