औरंगाबाद : एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकण्याची मिळविण्याची संधी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध होईल. शिक्षण, नोकरी, कामधंदा करताना ऑनलाईन एमबीए आणि एमसीए या पद्व्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) अर्ज प्रक्रिया केली असून, त्या मान्यतेनंतर यूजीसीची परवानगी पाठपुरावा करू, असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले.
ड्युअल डिग्री प्रोग्राम अंतर्गत एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमासाठी गेल्या शैक्षणिक वर्षात एआयसीटीईची मान्यता मिळाली होती. मात्र, त्यावेळी अभ्यासक्रमाची तयारी झालेली नव्हती. यावर्षी या ऑनलाईन अभ्यासक्रमाची तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर एआयसीटीईकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी १० हजार जागांवर प्रवेशाची परवानगी मागितली आहे. एआयसीटीईची परवानगी मिळताच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करून १ ऑगस्टपासून नव्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन एमबीए, एमसीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतील, असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.
परीक्षा अन् निकाल वेळेत१ जूनपासून पदवी, तर २१ जूनपासून पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा सुरू होत आहे. ऑनलाईन होणाऱ्या या परीक्षेत प्रत्येक तासासाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वेळापत्रकानुसार परीक्षा, पुढील पाच ते सात दिवसांत तपासणीचे काम करून वेळेत निकाल लावण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
प्रवेश प्रक्रियेचे नियोजन सुरू१ ऑगस्टपासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी एका छताखाली प्रवेशोत्सव होईल. प्रवेश समितीचे अध्यक्ष डाॅ. सुरेश गायकवाड हे नियोजन करीत असून, यावर्षी ऑनलाईन शुल्क भरण्याचीही व्यवस्था असेल. नोंदणी, गुणवत्ता यादी, आक्षेप, समुपदेशनातून थेट प्रवेशाची सुविधा असेल.
सायबर सुरक्षेचा सर्टिफिकेट कोर्सकाॅम्युटर सायन्स विभागांतर्गत सायबर सिक्युरिटीचा सर्टिफिकेट कोर्स युजीसीच्या सूचनेप्रमाणे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मेडिकल टुरिझम या कोर्सेसला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.