लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला असून, संबंधित पुरवठादारांची ३० टक्के रक्कम अदा न करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्यापाणीपुरवठा विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने हातपंपांवर क्लोरिनेशन युनिट बसविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पूर्वी हातपंपांच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी क्लोरिन टाकले जायचे. परिणामी, क्लोरिनमुळे रासायनिक क्रिया होऊन हातपंपांचे पाईप खराब व्हायचे. ते टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाचे आधुनिक उपकरण हातपंपाला बसविल्यास क्लोरिनच्या गोळ्या पाण्यामध्ये आपोआप जातात व ग्रामीण नागरिकांना शुद्ध पाणी मिळते. यामुळे जुलाब, डायरिया, कावीळ आदी साथजन्य रोगांपासूनही बचाव होतो.तथापि, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या या प्रस्तावाला मान्यता दिली. यासाठी जिल्हा नियोजन समितीने दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, पाणीपुरवठा विभागाने ही उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या; पण प्रतिसादच मिळत नव्हता. तब्बल ९ वेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.शेवटी अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. ७ हजार ९९९ रुपये प्रति उपकरण या दराने ४२५ गावांत १८६५ पंपांवर ही उपकरणे बसविण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने सदरील पुरवठादाराची ३० टक्के रक्कम देखभाल दुरुस्तीसाठी राखून ठेवली आहे.सर्वच ठिकाणी दर्जेदार उपकरणेयासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी ही उपकरणे हातपंपांना लावण्यात आलेली आहेत. सर्वच ठिकाणी ही उपकरणे सुरळीत व चांगल्या प्रकारे सुरू आहेत.या उपकरणांमुळे ग्रामीण भागात पाण्याद्वारे उद्भवणाऱ्या साथरोगाला आळा बसणार आहे. याशिवाय नागरिकांना शुद्ध पाणीही मिळत आहे. संबंधित पुरवठादारासोबत जि.प. पाणीपुरवठा विभागाने करार केलेला आहे की, या उपकरणांची नियमित देखभाल दुरुस्ती पुरवठादाराने करावी. ती न केल्यास संबंधित पुरवठादाराची ३० टक्के रक्कम वर्षभरासाठी राखून ठेवलेली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाणी शुद्धीकरण साधणे निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:51 PM
जिल्ह्यातील ४२५ गावांमध्ये बसविण्यात आलेली निर्जंतुकीकरण (क्लोरिनेशन युनिट) उपकरणे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सभापती विलास भुमरे यांनी केला
ठळक मुद्देआरोप : पुरवठादाराचा निधी रोखण्याची जि.प. सभापतींची मागणी