औरंगाबाद : मंदिरात सात फेरे घेण्याचे नाट्य वठल्यानंतर १ लाख ५० हजार रुपये व अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह धूम ठोकणाऱ्या वधूसह तिच्या बनावट नातेवाईकांना मुकुंदवाडी पोलिसांनी चतुर्भुज केले. लग्न न जुळणाऱ्या तरुणांना हेरून गेटकेन लग्नाचे नाटक वठवून ही टोळी पैसे व दागिने घेऊन पोबारा करीत होती.
या टोळीची सूत्रधार सविता राधाकिसन माळी ही असून, तिच्यासह संगीता विश्वनाथ वैद्य, अर्चना देवीदास ढाकणे, पूजा अजय राजपूत आणि रवी तेजराव राठोड या आरोपींना अटक करण्यात आली. गणेश भाऊसाहेब पवार (२७, रा. कारेगाव, ता.श्रीरामपूर) या तरुणाच्या लग्नासाठी वधूचा शोध सुरू होता. महिनाभरापूर्वी गणेशच्या भावजयीला सविताने फोन करून ३ ते ४ मुलींचे स्थळ सुचविले. काही मुलींची छायाचित्रे आणि आधार कार्ड तिने पाठवले. अर्चना शिंदे ही मुलगी त्यांना पसंत पडली.
आई-बाबांसह सर्वच बनावट सविताने अर्चनाचा बनावट टीसी व्हॉटस्ॲपवर पाठवला. लग्नासाठी वराच्या माता-पित्यांना दीड लाख रुपये रोख हुंडा आणि वधूच्या अंगावर सोन्याचे दागिने व शालू घालण्यासही तिने सांगितले. मुलगी स्वजातीय असल्यामुळे वर पक्षाने होकार कळविला. कोरोनामुळे एकाच दिवसात लग्न करायचे असल्याचे सांगून संगीताने वऱ्हाडींना औरंगाबादेत बोलावले. नवरदेव गणेशसह भाऊ, भावजयी मित्रमंडळी वाहनाने रविवारी औरंगाबादेत आले.
कुंभेफळ येथील मंदिरात लग्न वऱ्हाडी येथे आल्यावर वधू अर्चना, तिचे बनावट आई-बाबा, मामा आणि अन्य नातेवाईक वऱ्हाडींना कुंभेफळ येथील नवनाथ मंदिरात घेऊन गेली. तेथे गणेश आणि अर्चनाचे लग्न लावण्यात आले. सविताने गणेशच्या भावाकडून रोख दीड लाख रुपये घेतले. यानंतर वेगवेगळे बहाणे करून सविता आणि तिचे साथीदार तेथून पसार झाले. वधू अर्चनानेही रस्त्यात कार थांबवण्यास सांगून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वऱ्हाडींनी मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, उपनिरीक्षक सुनील चव्हाण, अमोल मस्के, बाबासाहेब कांबळे, संतोष भानुसे, विलास मुठ्ठे, मनोहर गिते आणि महिला कर्मचारी कुंडकर यांनी रात्रभर शोध घेऊन आरोपींना पकडले. या टोळीने तब्बल दहा तरुणांना असेच फसविल्याचे समोर आले. त्यांच्याकडे मुलींच्या वेगवेगळ्या नावांची कागदपत्रेही पोलिसांना सापडली.