औरंगाबाद : एअर इंडियापाठोपाठ आता इंडिगोनेही मुंबई-औरंगाबाद-मुंबईविमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली असून दि. १५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून ४ दिवस हे विमान औरंगाबादहून उड्डाण घेणार आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.
१९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू केली. सप्टेंबरपासून औरंगाबादहून मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन इंडिगोने केले होते. परंतु स्लॉटच्या कारणावरून ही विमानसेवा सुरू होणे लांबणीवर पडले होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपून दि. १५ ऑक्टोबरपासून इंडिगोचीही मंगळवार, गुरुवार, शनिवारी आणि रविवारी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे.
इंडिगोच्या उड्डाण वेळा-
मुंबईहून दुपारी ११.३५ वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.३५ वाजता इंडिगोचे विमान औरंगाबादेत दाखल होईल. त्यानंतर दुपारी १.१० वाजता औरंगाबादहून उड्डाण घेईल आणि दुपारी २.१० वाजता हे विमान मुंबईत पोहोचेल.
बंगळुरु विमानसेवेसाठी प्रयत्न
औरंगाबादहून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे. किमान छोट्या विमानाद्वारे आठवड्यातून ३ दिवस ही विमानसेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. लवकरच ही सेवा सुरु होईल, अशी आशा आहे.
- सुनीत कोठारी, उद्योजक