- बापू सोळुंके
औरंगाबाद : क्रेझ काय? फक्त राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचीच असते काय? शहर पोलीस दलातील कम्युनिटी पोलिसिंगमध्ये ‘पटाईत’ ठरलेले पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा जलवा गेल्या २४ तासात शहरवासीयांना पाहायला मिळाला. सोनवणे यांच्या रविवारी साजऱ्या झालेल्या वाढदिवसानिमित्त चाहते, समर्थकांनी तब्बल १७ केक कापून एक विक्रमच नोंदवला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व हे प्रेम पाहून ‘घनश्याम सुंदरा... केक कापले सतरा...’ अशी कवणं नागरिकांच्या ओठावर नाचू लागली.
शहरात अद्याप कुणाच्याही वाढदिवसाला १७ केक कापल्याची तशी नोंद नाही. अर्थात हा आकडा सतराच का? सोनवणे यांचा हा वाढदिवस सतरावा नक्कीच नाही. मग कसे? समर्थक आपल्या नेत्यांची पेढे, जिलेबी तुला करतांना आपण पाहिले असेल. त्याच पद्धतीने सोनवणे यांच्या संपूर्ण नावाचीही तुलाच समजा. त्यांच्या संपूर्ण नावात १७ इंग्रजी अल्फाबेट (अक्षर) आहेत. त्यावरून त्यांच्या समर्थकांनाही ही आयडियाची कल्पना सुचली व त्याने १७ केक आणले. गारखेडा परिसरातील गजानन कॉलनीमध्ये एका गॅरेजमध्ये या केक कटींगचा स्नेहमयी सोहळा पार पडला. प्रेमात अडसर आणणारा कोरोना कोण? त्यांच्या चाहत्यांनी कोरोनाला अक्षरश पायदळी तुडविले. आता कोरोना निर्बंध उठले आहेत. अनेक दिवसापासून मास्क आड लपवलेले चेहरे यानिमित्त मोकळे होऊन या सोहळ्याचे सुंदर शूटिंगही करण्यात आले. शुभेच्छाही देवाण घेवाण झाली. हे फोटोसेशन व्हायरल झाले व लोक , घनश्याम सुंदरा.... म्हणू लागले.
केक अनाथालयास पाठविलेमाझ्या जन्मदिनानिमित्ताने केक कापण्यासाठी मला वारंवार फोन करून बोलावण्यात आल्याने मी तेथे गेलो. तेथे टेबलवर ठेवलेल्या १७ केकपैकी मी एक केक कापला. यानंतर हे केक पारिजातनगर येथील अनाथआश्रमातील बालकांना पाठविण्याचे संयोजकांना मी सांगितले.-घनश्याम सोनवणे, सपोनि, पुंडलिकनगर ठाणे.