छत्रपती संभाजीनगर : विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजना, तर धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेला निधी मिळालेला नसल्यामुळे दोन्ही योजनांचे लाभार्थी मागच्या वर्षापासून दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, शासनाने ‘लाडकी बहीण’ योजनेकडे निधी वळविण्यात आल्यामुळेच आवास योजना अडचणीत आली असावी, अशी कुजबुज सध्या लाभार्थ्यांमध्ये आहे.
गतवर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजनेंतर्गत जिल्ह्याला १५४६ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यापैकी विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या ७३८ लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाले व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या २०२ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला. दुसरीकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेत २ हजार ८५९ धनगर समाजाच्या लाभार्थ्यांसाठी घरकुलांचे उद्दिष्ट होते. यापैकी १ हजार ८८९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि ६२३ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात आला. या लाभार्थ्यांनी मिळालेल्या पहिल्या हप्त्यानंतर घरकुलांचे बांधकाम सुरू केले. दुसरा हप्ता मिळेल, या आशेवर हातउसने पैसे घेऊन बांधकाम सुरू ठेवले; पण दहा महिने होत आले तरीही निधीच प्राप्त होत नसल्यामुळे लाभार्थी हतबल झाले आहेत.
१६ हजार लाभार्थ्यांचा रखडला पहिला हप्ताफेब्रुवारी महिन्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याला ७४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (डीआडीए) ७० हजार ९१२ घरकुलांना मंजुरी दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या ५४ हजार ३०४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता, तर ५८४८ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता जमा केला. उर्वरित लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, जागेचा नमुना ८ ‘अ’चा उतारा जमा केला नाही, काहींनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक (केवायसी) केलेले नाही. त्यामुळे अशा सुमारे १६ हजार लाभार्थ्यांचा पहिला हप्ता रखडला आहे. कागदपत्रांची पडताळणी आता ‘पीएफएमएस’ या संगणक प्रणालीवरच केली जात असल्यामुळे त्यांची नावे घरकुलाच्या हप्त्यासाठी बँकेत जात नाहीत.