औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागातील सर्जिकल इमारतीच्या पाठीमागील रस्ता अचानक बंद करण्यात आला. परिणामी, या रस्त्याने होणारी आॅक्सिजन सिलिंडरची ने-आण आता थेट रुग्ण आणि नातेवाईकांच्या गर्दीतून होत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांना हातभार लागत असल्याने ‘आॅक्सिजन सिलिंडर’चे संकट उभे राहिले आहे.
घाटीत सर्जिकल इमारतीच्या पाठीमागील भागातून पूर्वी आॅक्सिजन सिलिंडरची ने-आण केली जात होती; परंतु चार महिन्यांपूर्वी हा रस्ता अचानक बंद करण्यात आला. सुपरस्पेशालिटी विभागाच्या कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा रस्ता मोकळा करण्याची सूचना घाटी प्रशासनाने कंत्राटदाराला केली आहे; परंतु तरीही रस्ता मोकळा होत नाही. त्यामुळे नाइलाजाने कर्मचाऱ्यांना सर्जिकल इमारतीतून रिकाम्या आणि भरलेल्या सिलिंडरची ने-आण करावी लागत आहे. याठिकाणी रुग्णांची वर्दळ असते, तसेच रुग्णांचे नातेवाईक थांबलेले असतात. सिलिंडर घेऊन जाताना अनेकदा ते कर्मचाऱ्यांच्या हातातून पडतात. अशावेळी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रस्ताव रेंगाळलाघाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने ६ कोटींचा प्रस्ताव तयार केला. सर्जिकल इमारतीमध्ये लिक्विड आॅक्सिजन सिस्टीम बसविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली. त्यामुळे सिलिंडरद्वारे आॅक्सिजन पुरवताना निर्माण होणारा धोका लवकरच कायमस्वरूपी दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त झाली; परंतु प्रस्ताव लालफितीत अडकल्याने अद्यापही सिलिंडर उचलून नेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि संपल्यावर बदलण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. येथे दररोज ३० ते ४० सिलिंडर लागतात.
लवकरच रस्ता मोकळाआॅक्सिजन सिलिंडरची ने-आण करण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची सूचना कंत्राटदारास केली आहे. त्यामुळे लवकरच रस्ता मोकळा होईळ, अशी माहिती घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी दिली.