औरंगाबाद : असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्राच्या वतीने (अस्मि) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील १८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स विद्यावेतन वाढीसह इतर मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली असून, निवासी डॉक्टरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाने २०१५ मध्ये विद्यावेतन वाढविण्याचे आश्वासन दिले. तसा निर्णयही घेतला गेला. मात्र, याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. केवळ आश्वासनांची बोळवण करून प्रशिक्षर्णी डॉक्टर्सना संप मागे घेण्यासाठी शासनाने देखावा केला होता. म्हणूनच विद्यावेतन वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, यासाठी बेमुदत संपाचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आल्याचे संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी किशोर डुकरे यांनी सांगितले. तातडीने सर्व आंतरवासिता डॉक्टरांचे विद्यावेतन वाढविण्यात यावे, कामे निश्चिती व कामांच्या वेळा निर्धारित करणे, फेब्रुवारी २०१८ पासून विद्यावेतनात वाढ लागू करावी, संपामुळे आंतरवासितांना मुदतवाढ करू नये आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सहा हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते. ते १५ हजार रुपये करण्याची मागणी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केली. तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने जॉइंट सेक्रेटरी किशोर डुकरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी दिले. संघटनेच्या मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्याचे आश्वासन प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना डॉ. सुके्र यांनी दिले. मागण्या दोन ते तीन दिवसांत मंजूर न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.