औरंगाबाद : घाटी ही गुणवत्तेचे उपचार आणि शिक्षण देणारी संस्था म्हणून वाढावी असे २०-३० वर्षांपुर्वी इथे शिकतांना वाटायचे. मात्र, तशी वाढ झालेली दिसत नाही. इथला परीसर स्वच्छ सुंदर व्हावा. कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी. विद्यार्थी आणि रुग्णाभिमूख घाटी करण्यासाठी प्रयत्न असेल. इथल्या अडचणी, गरजा माहीत आहे. चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक आणि काम न करणाऱ्यांवर कारवाई करू. तसेच रुग्ण डाॅक्टर संवाद वाढीवर भर असेल असे नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड म्हणाले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाल्यावर ते शुक्रवारी रूजू झाले. प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांच्याकडून ते सोमवारी रितसर पदभार स्विकारतील. शुक्रवारी नव्या अधिष्ठातांना भेटीसाठी अधिकारी, विभागांच्या डाॅक्टर, विद्यार्थ्यांची रिघ लागली होती. विविध संघटनांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपाधिष्ठाता डाॅ. शिराझ मिर्झा बेग, डाॅ. मारोती लिंगायत, डाॅ. विकास राठोड यांच्यासह डाॅक्टरांची उपस्थिती होती. घाटी मुंबई-पुण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रांगेत यावी. इथल्या शिक्षणाचा आणि रुग्णसेवेचा दर्जा वाढावा, डाॅक्टर कर्मचाऱ्यांनी रुग्णाभिमूख काम करण्यासाठी उपाययोजना करू. तसेच परिसर स्वच्छता हा विषय माझ्या अजेंड्यावर असेल. लवकरच रुग्णालयाची पाहणी करू. असे अधिष्ठाता डाॅ. राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कामचुकांरांची माहिती घेवून आले....गेल्या २ महिन्यांपासून घाटीसंबंधीची माहिती घेत होतो. इथे कोण काम करतो आणि कोण कामचुकार आहे. हे माहीत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांची नियमानुसार जबाबदारी पार पाडावी. काम करावे लागेल. अन्यथा कारवाई निश्चित आहे. असा इशारा अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी रूजू होताच पहिल्या दिवशी दिला.