औरंगाबाद: अपघातामधील जखमीला घाटीत दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी डॉक्टरांना सूचना करा या कारणावरून तीन ते चार जणांनी तेथील पोलीस चौकीत पोलिसांशी वाद घातला. तसेच त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घाटी रुग्णालयातील पोलीस चौकीत झाली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली.
अमितसिंग अनिलकुमारसिंग(रा. पडेगाव)आणि मॉन्टीसिंग असे गोंधळ करणार्यांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पडेगाव रोडवर बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातामधील दोन जखमींना अमितसिंग आणि अन्य तीन ते चार जणांनी छावणी पोलिसांच्या मदतीने घाटीत दाखल केले. यानंतर छावणी पोलीस तेथून निघून गेले.
काहीवेळानंतर अमितसिंग आणि अन्य लोक घाटी मेडिकल चौकीत आले. तेथे पोलीस नाईक अंकुश टेकाळे आणि ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.बी.घुगे हे गुरूवारी रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. यावेळी अमितसिंग आणि मॉन्टीसिंग म्हणाले की, आम्ही अॅडमिट केलेल्या रुग्णावर उपचार करण्याचे डॉक्टरांना सांगा, तेव्हा टेकाळे यांनी त्यांना तुम्ही निवासी वैद्यकीय अधिकार्यांना भेटा,असे सांगितले. तेव्हा तुमचे काय काम आहे, असा सवाल केला. त्यावेळी आम्ही केवळ येथून एमएलसी पास करण्याचे काम करतो,असे उत्तर दिले. यानंतर वाद वाढला.
यावेळी अमितसिंग यांनी कुणालातरी फोन लावून फोन घेण्याचे सांगितले. तक्रारदार यांनी फोन घेण्यास नकार देताच, तू दारू पिऊन नोकरी करतो, तुझे आम्हाला मदत करण्याचे काम नाही,असे लिहून दे, म्हणून त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. शिवीगाळ करीत टेकाळे यांच्या युनिफॉर्मची कॉलर पकडून त्यांना धक्काबुकी केली. पोलीस आयुक्तांना भेटून तूझी नोकरी घालवितो अधी धमकी दिली. बेगमपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच चार्ली पोलीस घटनास्थळी आले. यानंतर चौकीत गोंधळ घालणारे तेथून निघून गेले.