नितांत सुंदर अशा दाट जंगलाने वेढलेल्या अजिंठा डोंगर रांगेतच अजिंठा लेणी व घटोत्कच लेणी आहे. समृद्ध वनराजी असलेला हा भाग पावसाळ्यात अधिकच खुलतो. महाराष्ट्रातील महायान पंथीय लेणीतील पहिली लेणी म्हणून घटत्कोच लेणीचे महत्त्व आहे. बौद्ध संस्कृतीचा प्रगल्भ वारसा या लेणीत आपल्याला पाहायला मिळतो. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गौतम बुद्धांची भव्य मूर्ती पाहायला मिळते. प्रसिद्धी आणि प्रचार कमी असल्याने ही लेणी बहुतांश पर्यटकांना ठाऊकही नाही.
काय पाहाल -
घटोत्कच लेणीचे मुख्य आकर्षण तेथील विहार आहे. हे विहार आकाराने चौकोनी असून त्याला ३ आयताकृती प्रवेशद्वार आहेत. समोरील भागात सहा अष्टकोन स्तंभ आहेत. त्यावरही सुंदर कोरीव काम आहे. आत अष्टकोनी स्तंभ असून स्तूप कोरलेले आहे. बाजूला भगवान बुद्धांची विविध मुद्रांतील कोरलेली शिल्पे आहेत. मागच्या बाजूस ३ गर्भगृहे आहेत. डाव्या बाजूला ७ लहान आणि उजव्या बाजूला ५ खोल्या आहेत. विहाराच्या डाव्या बाजूस वाकाटक नरेश हरिशेन यांचा प्रधान वराहदेव याचा २२ ओळींचा शिलालेख कोरलेला पाहायला मिळेल. पावसाळ्यात लेणी समोरचा धबधबा आणि मोरांचा आवाज असा विलक्षण अनुभव येथे येतो.
कसे जाल -
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव-उंडणगावमार्गे अंभई येथे यावे. वडेश्वराचे पुरातन मंदिर पाहून १० किलोमीटर अंतरावरील जंजाळा गावाकडे जावे. येथून जवळच घटोत्कच लेणी आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडीमार्गेही घटोत्कच लेणीकडे जाता येईल. आणखी एक, तुम्ही घरातून लवकर निघाला तर जंजाळा किल्ला, वाकाटकांची घटोत्कच लेणी, वेताळवाडीचे धरण असा सलग पट्टा एका दिवसात बघून होईल.