लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातावर मेदी... हिरवा चुडा...नवे कपडे... अन् डोळ्यात अश्रू... वाट चुकलेली एक चिमुकली आईच्या शोधात भरउन्हात भटकत होती. वाहतूक पोलिसांची तिच्यावर नजर पडली अन् तिला मायेने जवळ घेऊन चौकशी केली. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर तिची आई शोधून देण्यात पोलिसांना यश आले. लेकीच्या भेटीनंतर आईला अक्षरश: गहिवरुन आले. रविवारी मातृत्व दिनी येथे पोलिसांनी मायलेकींची पुनर्भेट घडवून दिली.कार्तिकी दिनकर राऊत (रा. पाडळसिंगी, ता. गेवरार्ई) असे त्या चिमुकलीचे नाव आहे. अडीच वर्षीय ही चिमुरडी आईसमवेत नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी गावी गेली होती. लग्नसोहळा आटोपून त्या दोघी व इतर नातेवाईक पाडळसिंगीला जाण्यासाठी शहरातील साठे चौकात आल्या. येथे वाहनाच्या प्रतीक्षेत सर्वजण थांबले होते. जवळच उभी असलेली कार्तिकी आईचे बोट सोडून अचानक गायब झाली.आई व इतर नातेवाईक दिसत नसल्याने तिने रडण्यास सुरूवात केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोहेकाँ गोविंद पाखरे, एस. बी. वनवे यांनी तिला पाहिले. तिची चौकशी केली असता तिला केवळ नाव सांगता येत होते. जवळपास नातेवाईक नसल्याने त्यांनी तिला वाहतूक शाखेत आणले. तेथे तिला चॉकलेट व पाणी देऊन विचारपूस केली. मात्र, तिला केवळ स्वत:चे पूर्ण नाव सांगता येत होते. गावाचे नाव विचारले तेव्हा गाव खूप दूर आहे एवढेच ती सांगत होती. पोलिसांनी नियंत्रण कक्षासह शहरातील तिन्ही ठाण्यांना कार्तिकीबद्दल कळविले. सोबतच सोशल मीडियावरून तिची माहिती व्हायरल केली. आईची आठवण काढून सारखी रडत असे. ती जेथे सापडली, तेथे नातेवाईक आले असावेत म्हणून पोलिसांनी तिला दुचाकीवरून पुन्हा साठे चौकात नेले. तेथे तिची आई शांताबाई लेकीचा शोध घेत होती. तिला सुरक्षित पाहून तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिला कुशीत घेऊन त्यांनी डोक्यावरून मायेचा हात फिरवला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.
हरवलेल्या लेकीला पाहून गहिवरली आई..!
By admin | Published: May 14, 2017 10:41 PM