औरंगाबाद : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण होत आहेत. मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याच्या घटना सतत होत आहे. परंतु तरीही मुक्या प्राण्यांप्रती आपुलकी, प्रेम कायम असल्याची प्रचिती दोन युवकांनी दिली आहे. कडाक्याच्या थंडीत कुडकुडणार्या श्वानाच्या पिलासाठी अवघ्या क्षणात निवारा उभारून त्याला मायेची ऊब दिली.
प्रयास युथ फाऊंडेशनचे रवी चौधरी आणि सिद्धार्थ इंगळे असे या युवकांचे नाव आहे. ९ जानेवारीला दोघे रात्री ९ वाजेच्या सुमारास विशालनगर,पुंडलिकनगर रोड येथून जात होते. यावेळी श्वानाचे एक पिलू थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या निदर्शना पडले. त्यांनी तात्काळ या पिलाच्या मदतीसाठी धाव घेतली. जवळच असलेल्या एका किराणा दुकानातून दोन पोते घेतले. दगड आणि पोत्याच्या मदतीने त्यांनी श्वानाच्या पिलासाठी निवारा तयार केला. या निवार्यात या पिलाला थंडीमध्ये चांगलीच ऊब मिळाली. त्यामुळे काही वेळेतच ते झोपी गेली. हे पाहून दोघांना समाधान मिळाले.
शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत. मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. त्यामुळे मोकाट कु त्र्यांविषयी अनेकांकडून ओरड केली जाते. भटकी कुत्री आणि उपद्रव हे समिकरणच झाले आहे. रस्त्यावर मोकाट कुत्रा दिसला कीत्याच्या दिशेने दगड भिरकावले जाते. त्याचा फटका अनेकदा छोट्या पिलांनाही बसतो. मोकाट कुत्र्यांविषयी ओरड करणार्यांची संख्या अधिक असली तरी रवी चौधरी आणि सिद्धार्थ इंगळे यास अपवाद ठरले. श्वानाच्या पिलासाठी निवासा उभारून त्यांनी वेगळा पायंडा पाडला.