विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येत्या ११ आॅक्टोबरला महापालिकेसाठी मतदान होत आहे. काँग्रेससह सेना-भाजप- राष्ट्रवादींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर एएमआयएम आणि बसपाही मैदानात आहेत. आता प्रचाराच्या दुसºया टप्प्यात राज्यस्तरावरील दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सेनेकडून पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता वाढू लागली आहे. सत्ताधारी काँग्रेसने या निवडणुकीत सर्व म्हणजे ८१ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे. त्यापाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार रिंगणात असून शिवसेना ६३, राष्ट्रवादी काँग्रेस ५५, एएमआयएम ३२ तर बहुजन समाज पार्टी १७ जागांवर निवडणूक लढवित असून अपक्ष उमेदवारांमुळेही अनेक प्रभागांत काट्याच्या लढती होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी कॉर्नर सभांवर भर दिल्याचे दिसून येते. याबरोबरच उमेदवारांसह पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे काही दिवस नाराजांची मनधरणी करण्यामध्ये गेले आहेत. आता प्रचाराच्या दुसºया टप्प्यात थेट रस्त्यावरची लढाई सुरू होत आहे. या लढाईमध्ये प्रचार सभांचा धडाका असणार आहे. सत्ताधारी काँग्रेसने नांदेड शहराची एकूण सामाजिक स्थिती पाहून नेत्यांना सभांसाठी निमंत्रित केल्याचे दिसते. स्थानिक पातळीवर आ. अमरनाथ राजूरकर आणि आ. डी. पी. सावंत प्रचाराची धुरा सांभाळत असले तरी प्रचाराच्या दुसºया टप्प्यात काँग्रेसकडून प्रसिद्ध क्रिकेटपट्टू नवज्योतसिंघ सिद्धु, खा. मोहमद अझरुद्दीन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याबरोबरच पक्षाचे माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, नसिमखान, वर्षा गायकवाड, तेलंगणाचे विरोधी पक्षनेते शब्बीर अली, निजामाबादचे माजी आ. व्ही. गंगाराम, माजी मंत्री अनिस अहमद आदींच्या सभा रंगणार आहेत. शहरातील सर्व प्रभागांमध्ये किमान एक ते दोन मोठ्या सभा व्हाव्यात असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जंगी सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या बरोबरच सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील, अमोल कोल्हे, मुंबईतील सेनेचे नेते हाजी अराफत शेख, बबनराव घोलप, अर्जुन खोतकर आदी नेत्यांच्या सभा होणार आहेत.राष्ट्रवादीकडून प्रचारसभांमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनील तटकरे, नवाब मलिक, बाबाजानी दुर्राणी, फौजिया खान, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह आ. सतीश चव्हाण दिसणार आहेत. एएमआयएमच्या वतीने पक्षाचे नेते खा. अस्ओद्दिन ओवैसी स्वत: मेहनत घेत आहेत. त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवैसीही दुसºया टप्प्यात नांदेडमध्ये येणार आहेत.
दिग्गजांच्या प्रचार तोफा धडाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:15 AM