औरंगाबाद : रंगार गल्ली भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीला डेंग्यू झाल्याने आज सकाळी तिचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. डेंग्यूने मरण पावलेल्या या चिमुकलीचे नाव आयुषी रेणुकादास बोंबले असे आहे. शहरात मागील पाच दिवसांमध्ये डेंग्यूने तब्बल पाच बळी घेतले आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरात डेंग्यूच्या तापाने थैमान घातले आहे. डेंग्यूची विविध रुग्णालयांमध्ये 117 रुग्ण दाखल झाले आहेत. शहर तापाने फणफणले असताना महापालिका आयुक्त डॉक्टर निपुण विनायक बेंगलोर येथे ठाण मांडून बसले आहेत. स्मार्ट सिटीचे सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणून त्यांना बंगळुरू येथे पुरस्कार देण्यात येणार होता. त्यामुळे ते बंगळुरू येथे तीन दिवसांपूर्वी रवाना झाले आहेत. विशेष बाब म्हणजे औरंगाबाद शहरात ज्या पाच नागरिकांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे तेथे आयुक्तांनी साधी सदिच्छा भेट ही दिली नाही.