लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एटीएम कार्डची अदलाबदल करून तब्बल चौदा जणांना गंडा घालणाºया सायबर गुन्हेगाराने चोरीच्या पैशातून आईला सोन्याचे दागिने, सासू-सासºयांना कपडे आणि स्वत:साठी जुना ट्रक खरेदी केल्याची माहिती समोर आली. आरोपीचे आणखी दोन साथीदार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाणा राज्यातील मेवातकडे रवाना झाले.एटीएम कार्डची अदलाबदल करून, पिन नंबर चोरून किंवा नागरिकांना भ्रमित करून चौदा जणांच्या बँक खात्यातून ५ लाख ५९ हजार ५०० रुपये परस्पर काढून फसवणूक करणाºया मोहंमद सलीम हजीर खान (३३, रा. सुनारी, ता. तौर, जि. मेवात, हरियाणा), यास दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून, चौकशीदरम्यान त्याने सिडको भागात आणखी एकाची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याने गंडविलेल्या नागरिकांची संख्या पंधरावर गेली. या आरोपीची सासुरवाडी खोडगाव (ता. औरंगाबाद) येथील आहे. पैसे काढण्याच्या निमित्ताने तो एटीएम सेंटरवर जाई. यावेळी समोरच्या व्यक्तीच्या हातात ज्या रंगाचे आणि बँकेचे एटीएम कार्ड आहे, तसेच कार्ड तो त्याच्याकडे ठेवत असे, पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करून तो सराईतपणे कार्डची अदलाबदल करी. शिवाय पिन नंबरही विचारून घेई. काही वेळा पिन चोरून पाही आणि नंतर त्या कार्डचा वापर करून पसार होत असे. या आरोपीने चौदा ग्राहकांच्या खात्यातून पळविलेल्या ५ लाख ५९ हजार ५०० रुपयांतून आईला दागिने, सासू-सासºयांना कपडे आणि स्वत:साठी साडेचार लाखाचा जुना ट्रक खरेदी केल्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपींनी लोकांच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तू जप्त करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, कर्मचारी शेख अस्लम, प्रकाश सोनवणे यांचे पथक रात्री हरियाणाला रवाना झाले.
चोरीतून आईला दागिने, सासºयाला कपडे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:10 AM