वाळूज महानगर : भरधाव दुचाकीस्वाराने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोराची धडक देऊन ५० फूट फरपटत नेल्याची भीषण घटना रांजणगाव येथील गांधीनगरात मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
आमिषा सुरेंद्र गुप्ता (१६, रा. गांधीनगर दत्तनगर, रांजणगाव), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. रात्री पाणी भरत असताना भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने आमिषाला जोराची धडक देत फरपटत नेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला सोडून दुचाकीस्वार (एमएच-२० ईटी-३३४४) घटनास्थळावरून पळून गेला. नातेवाईक व नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने आमिषाला शासकीय दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
गांधीनगरात तिच्या घरासमोरच भरधाव वाहनाने धडक देऊन विद्यार्थिनीला जखमी केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली आणि तेथे मोठा जमाव जमला. नागरिकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची घाई केली. इकडे दुचाकीस्वार आरोपी तेथून पसार झाला. गुप्ता कुटुंब हे गांधीनगरात भाड्याच्या खोलीत राहते. मुलीचे वडील गावाकडे गेले असून, घराचे बांधकाम सुरू असल्याने भाऊ कामाकडे गेला होता. घरी आई आणि आमिषा होती. नळाला पाणी आल्याने ती प्लास्टिकच्या बकेटने पाणी भरत होती. त्याचवेळी ही गंभीर घटना घडली. दुचाकीस्वाराचा शोध वाळूज एमआयडीसी पोलीस घेत आहेत.
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात ती ११ वी (विज्ञान) वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थिनीवर असा काळाने घाला घातल्याने गांधीनगर व दत्तनगरात शोककळा पसरली होती. अपघातप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याप्रकरणी पोहेकॉ. चंद्रभान गवांदे अधिक तपास करीत आहेत.
गतिरोधक तोडल्याने दुचाकीस्वार सुसाटसिमेंटचा गुळगुळीत रस्ता असल्याने चालक सुसाट वाहने पळविताना दिसतात.मध्यंतरी ग्रामपंचायतीला सांगून गतिरोधक टाकले होते; परंतु अनेकांनी ते आपल्या सोयीसाठी काढून टाकल्याचे दिसत आहे.निवासी वसाहतीच्या रस्त्यावरून दुचाकीस्वार अति वेगात जातात. येथे पुन्हा गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
हातातील बकेटच्या ठिकऱ्याभरधाव दुचाकीस्वाराच्या जोरदार धडकेने तिच्या हातातील प्लास्टिक बकेटच्या ठिकऱ्या उडाल्या. मुलीला किमान ५० फुटांपेक्षा जास्त अंतरावर फरपटत नेल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घटनास्थळावरील चित्र पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.