- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : साडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावली, वरून छोटे स्टँड होते म्हणतात, मंग छोट्या स्टँडवर सलाईन का नाही लावली?, तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दात शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. सरोजनी जाधव, आदी उपस्थित होते.
खुलताबाद तालुक्यातील मौजे भडजी येथील एकनाथ गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. घाटीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली. या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. एका बालिकेवर सलाईन बाटली हातात धरण्याची वेळ आल्याचा विषय थेट दिल्लीपर्यंतही गेला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांनी जाब विचारला. या अजब कारभाराविषयी राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला.
सर्वांचीच केली कान उघडणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात पाहणी केली. डॉ. लहाने यांनी विविध विभाग आणि वॉर्डांची पाहणी केली. विविध सुविधांच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी वॉर्ड क्रमांक -१९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी लहान मुलीला सलाईन स्टँड धरण्याच्या प्रकारचा समाचार घेतला. यावेळी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. लहाने यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राहूल पांढरे, डॉ.विकास राठोड यांची उपस्थित होती.
( घाटीची बदनामी केली म्हणून उपचाराविना रुग्णाला हाकलले )