संजय तिपाले , बीडछकुली जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडाला होता. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आता एक किंवा दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या मातांपर्यंत पोहोचून त्यांना प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे.स्त्री भ्रूण हत्येमुळे बदनाम झालेल्या बीडमध्ये ही योजना याआधीच गतिमान होणे गरजेचे होते; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे यापूर्वी अशा प्रकारचे सर्वेक्षण झाले नव्हते. २०११ ची जनगणना व नियोजन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लिंगगुणोत्तर प्रमाण अतिशय धक्कादायक होते. १ ते ६ वर्षे वयोगटात १ हजार मुलांमागे केवळ ८०७ इतक्या मुली जन्माला येत होत्या असे समोर आले होते. मुलींच्या जन्मप्रमाणात संपूर्ण देशात तळाशी गेलेल्या बीडला सावरण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न झाले होते. सोनोग्राफी सेंटर्सच्या तपासण्या, जनजागृती व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या माता, पित्यांसह डॉक्टरांवरही धडक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, हे सर्व करता असताना मुलगा होण्याचा हट्ट न धरता एक किंंवा दोन मुलींवरच थांबणाऱ्या मातांना प्रोत्साहन देणारी सावित्रीबाई कन्या कल्याण योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविता आली नव्हती. वर्षभरात एकाही लाभार्थ्याला लाभ दिला गेला नव्हता, ही धक्कादायक बाब ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली होती. दरम्यान, जिल्ह्यातील स्त्री जन्माचा टक्का आता ८५० च्या पुढे सरकला आहे. मात्र, त्यात आणखी सुधारणा होण्यासाठी आता एक किंवा दोन मुलींवरच कुटुंब कल्याण करणाऱ्या मातांपर्यंत प्रशासनच पोहोचणार आहे. त्यासाठी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश लोखंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय मातांचे सर्वेक्षण करुन त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार असून कोणीही वंचित राहणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.जिल्ह्यात चालू वर्षी योजनेसाठी दीड लाख रुपयांचा निधी आलेला आहे.केवळ ८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जि.प. आरोग्य विभागाकडे आलेले आहेत. मात्र, ते प्रलंबितच आहेत. लाभार्थ्यांना अजून लाभ मिळालेला नाही. पाठपुरावा सुरु आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे म्हणाले.
जिल्ह्यात कन्या कल्याण योजना होणार गतिमान
By admin | Published: November 24, 2014 12:12 AM