औरंगाबाद : प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी मागे घेतली. गैरसमजुतीने आपण ही तक्रार नोंदविल्याचा जबाब पोलिसांकडे नोंदविला. दरम्यान, जेलमध्ये जाण्यापेक्षा लग्नाच्या बंधनात अडकणे तरूणाने पसंत केल्याने हे सर्व घडल्याचे समोर आले.
वैजापुर तालुक्यातील रहिवासी २४ वर्षीय सुनील (नाव काल्पनिक) हा एका ट्रकवर क्लीनर म्हणून काम करतो. औरंगाबादेतील रहिवासी ३६ वर्षीय सुनीता ही घरातच टेललिंगचे काम करते. मोबाईलच्या एका मिस्ड कॉल मुळे त्यांच्यात ओळख झाली. नंतर दोघेही वॉट्सअप आणि फेसबुक या सोशल मीडियावर आपसात चॅटींग करू लागले. चॅटींग दरम्यान दोघेही अविवाहित असल्याचे त्यांनी परस्परांना सांगितले. शिवाय त्याने तो बडोदा बँकेत नोकरी करीत असल्याचे सांगितले. तर तिनेही तिचे काम लपवून नोकरी करीत असल्याचे म्हणाली.
दोघांमध्ये रोज संवाद होत असत. चॅटींग करता-करता उभयतांनी त्यांचे ऐकमेकांवर प्रेम असल्याचे नमूद केले. नंतर दोघांनी भेटायचं ठरवल आणि तो १५ एप्रिल रोजी औरंगाबादेत आला. त्याची प्रतिक्षा करीत ती आधीच मध्यवर्ती बसस्थानकावर गेली होती. तेथे प्रथमच दोघांनी ऐकमेकांना पाहिले आणि ते तेथून सिद्धार्थ उद्यानात गेले. तेथे ओळखीचे लोक भेटतात, म्हणून तो तिला घेऊन मिलकॉर्नर येथील एका लॉजमध्ये गेला. लॉजमधील एका रुममध्ये लग्नाच्या अमिषाने सुनीलने आपल्यावर बलात्कार केला. आणि आता तो लग्नाला नकार देत आहे शिवाय त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यास आत्महत्या करीन अथवा जीवे मारून टाकीन अशी धमकी सुनीलने दिल्याची तक्रार पीडितेने २८ एप्रिल रोजी सिटीचौक ठाण्यात नोंदविली. आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्याचे कळताच त्याने तिच्याशी संपर्क साधून लग्नाची तयारी दर्शविली. सुनील लग्नाला तयार झाल्याचे पाहुन तिनेही बलात्काराची तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली.