औरंगाबाद : नेहरू गार्डन साठे चौक येथे भांडण सुरू असून तत्काळ घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दामिनी पथकाला मिळाल्या. त्यानुसार अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या दामिनी पथकावरच दोन मुलींनी हल्ला ( Girls attacks on Damini squad ) केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामिनी पथकातील उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार लता जाधव, आशा गायकवाड आणि चालक मनीषा बनसोडे या शहरात गस्तीवर होत्या. त्यांच्या पथकाला बेगमपुरा पोलीस ठाण्यात फोन आला की, नेहरू गार्डन साठे चौक येथे महिलांचे भांडण सुरू आहे. दामिनी पथकाच्या मदतीची तत्काळ गरज आहे. त्यानुसार दामिनी पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा नेहरू गार्डनमध्ये काम करणारे माळी अंबरसिंग सुरडकर यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी वैशाली यांना शुभांगी आकाश कारके (२१, रा. फाजलपुरा, एस. टी. कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ) हिच्यासह तिची १७ वर्षांची अल्पवयीन बहीण गार्डनमधून माती का घेऊ देत नाही, या कारणावरून मारहाण करीत होत्या.
दामिनी पथकाने सर्वांनाच शांत करीत, तुमची जी तक्रार असेल ती बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंदवा अशा सूचना केल्या. तसेच घटनास्थळावरून सर्वांनीच बाहेर जावे असे सांगितले. तेव्हा शुभांगी कारके हिने उपनिरीक्षकांवर हल्ला केला. तिला अडविण्याचा प्रयत्न इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर शुभांगीच्या अल्पवयीन बहिणीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील लाठी हिसकावून घेत कर्मचाऱ्यास मारली. या झटापटीत उपनिरीक्षकांच्या गणवेशावरील नेमप्लेट तुटून पडली. तसेच मारहाण करणाऱ्या शुभांगीचा कुर्ताही फाटला. दोन्ही बहिणी अतिशय आक्रमक झाल्यामुळे दामिनी पथकाने वाजवी बळाचा वापर करीत दोघींना आवरले. या प्रकरणी उपनिरीक्षक सुवर्णा उमाप यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात दोघींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेची तत्काळ दखल घेत बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी एका आरोपीला अटक केली. दुसरी अल्पवयीन निघाल्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत.
पोलीस आयुक्तांकडून दखलदामिनी पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी तत्काळ दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. यानुसार निरीक्षक पोतदार यांनी गुन्हा नोंदविला. तसेच दामिनी पथकाची आयुक्तांसह उपायुक्त अपर्णा गिते, निरीक्षक किरण पाटील आदींनी विचारपूस केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.