लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना ये-जासाठी एस.टी. महामंडळाची बससेवा निर्धारित वेळेत येत नसल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील मकोडी, जामआंध येथील ६० हून अधिक विद्यार्थिनींनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गुरूवारी ठाण मांडून अवेळी येणाºया बसविरोधात संताप व्यक्त केला.तालुक्यातील मकोडी, जामआंध येथील ६२ विद्यार्थिनी सेनगाव येथे शाळेत मानव विकास बसमधून ये-जा करतात. शिक्षण विभाग व एसटी महामंडळाने यंदा मानव विकास बसचा मार्गनिश्चिती करताना बसला याच मार्गावरील अतिरिक्त गावे दिल्याने या मार्गावर धावणारी बससेवा या दोन गावच्या विद्यार्थिनीसाठी गैरसोयीची ठरत आहेत.सकाळी ९ वाजता शाळा भरत असताना या विद्यार्थिनींना सकाळी ७ लाच बसच्या वेळेनुसार घरून निघावे लागत आहे. तर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटताना सदर बस विद्यार्थिनींना रात्री ७ च्या सुमारास सेनगाव येथून घेत असून ७.३० वाजता त्यांच्या गावी पोहोचत आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर २ ते अडीच तास या विद्यार्थिनींना सेनगावच्या बसस्थानकात असुरक्षित वातावरणात थांबावे लागत आहे.१५ ते २० दिवसांपासून या मार्गावर धावणारी मानव विकास बस उशिराने येत असल्याने संतप्त विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून या मार्गावरुन बससेवा वेळेत सुरु करण्याची मागणी केली.
विद्यार्थिनींचे पं.स.मध्ये ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:49 PM