छत्रपती संभाजीनगर : संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आदेश आहेत. जिल्ह्यात १९ पैकी मुलींची ९ वसतिगृहे असून, कुठेही महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आल्याचे दिसत नाही. एवढेच नव्हे, तर गृहापालांनी वसतिगृहांमध्येच राहावे, हा निकषही गुंडाळून ठेवला जात असल्याचे चित्र आहे.
शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींना निवासाची अडचण असते. बाहेर खोली घेऊन राहावे, तर सुरक्षेची हमी नसल्यामुळे पालक आपल्या मुलींना वसतिगृहालाच प्राधान्य देतात. इयत्ता दहावीपासून उच्च शिक्षणापर्यंत तसेच व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना समाज कल्याण वसतिगृहांत गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. सध्या या वसतिगृहांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली आहे. ३१ जुलै ही ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. असे असले तरी यापूर्वी प्रवेशित विद्यार्थी- विद्यार्थिनी वसतिगृहात राहात आहेत.
गेल्या महिन्यात मुंबईतील चर्नी रोड येथे सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या झाल्याने मुलींच्या वसतिगृहांसाठी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामुळे समाज कल्याण आयुक्तांनी राज्यातील प्रामुख्याने मुलींच्या शासकीय वसतिगृहांत महिला सुरक्षा नेमण्याचे आदेश जिल्हास्तरीय कार्यरत समाज कल्याण सहायक आयुक्तांना दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सहायक आयुक्तांनी चार-पाच दिवसांपूर्वी यासंदर्भात गृहपालांना तशा सूचना केल्या असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. याबाबतच खातरजमा करण्यासाठी समाज कल्याण विभागाचेे सहायक आयुक्त पी. बी. वाबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, उपलब्ध झाले नाहीत.
गृहपालांनी नेमून दिलेल्या वसतिगृहांच्या ठिकाणी राहाणे बंधनकारक आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांना कळतील व त्याचे वेळेत निराकरण होईल, असा त्यामागचा हेतू आहे. मात्र, अनेक वसतिगृहांत गृहपाल राहात नाहीत. जिल्ह्यात गृहपालांची अनेक पदे रिक्त असून, एकेकाकडे दोन-दोन, तीन-तीन वसतिगृहांचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. त्यानुसार त्यांना वसतिगृहात राहाण्याबाबतचे वेळापत्रक नेमून दिले आहे. पण, वेळापत्रकाची अंमलबजावणी होते का, हे पाहायला देखील या विभागाला वेळ नाही.
कुठे कोणती वसतिगृहे?जिल्ह्यात समाज कल्याण विभागाची १९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून, यात छत्रपती संभाजीनगर शहरात मुलांसाठी (कंसात मुलींची वसतिगृहे) ७ (४), वैजापूर- १ (१), कन्नड- १ (१), पैठण- १, सिल्लोड- (१), गंगापूर- (१) आणि वाळूज येथे एक असे मुलांसाठी १०, तर मुलींची ९ वसतिगृहे आहेत.