औरंगाबाद : मराठवाड्यात सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आजवर पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पुनरु ज्जीवन करण्यासाठी व नुकसानभरपाईसाठी शासनाने तातडीने १० हजार कोटींची मदत मराठवाड्याला जाहीर करावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने १८ विविध मागण्यांचे निवेदन रविवारी मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे परिषदेच्या सदस्यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप देशमुख, शरद अदवंत, गोपीनाथ वाघ, शिवाजी नरहरे, शंकर नागरे, भरत राठोड, प्रा. के. के. पाटील, टी. के. देशमुख यांच्यासह विविध खात्यांचे सचिव व अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात औरंगाबाद पर्यटन राजधानी घोषित करून त्याची कार्यवाही करावी. परभणी येथील कृषी विद्यापीठाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला देखील केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यावा. घाटीला सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा द्यावा. यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
मराठवाड्याला १० हजार कोटी द्या
By admin | Published: October 03, 2016 12:28 AM