छत्रपती संभाजीनगर : पैठण एमआयडीसीतील एका कंपनीच्या अधिकारी, मालकाकडे चार कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ठगास ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्याकडे कंपनी व्यवस्थापनाने तक्रार नोंदविल्यानंतर एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवित आरोपीस बेड्या ठोकल्या अटक केली.
विष्णु आसाराम बोडखे ( ५७, रा. सेंटपॉल मुधलवाडी, ता. पैठण ) असे आरोपीचे नाव आहे. पैठण एमआयडीसीतील नामांकित मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रा. लि. डी.८ या कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी अझरुद्दीन पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोडखे हा डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना कंपनीत भेटला. तेव्हा त्याने कंपनी चालू द्यायची असेल तर १० लाख रुपये द्यावे, लागतील अशी धमकी दिली. पठाण ही माहिती कंपनीच्या मालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तेव्हा वरिष्ठांनी कंपनी नियमानुसार चालत असल्यामुळे पैसे द्यायचे नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर बोडखेने कंपनीच्या विरोधात विविध सरकारी कार्यालयामध्ये निवेदने दिली. त्यामुळे कंपनीची बदनामी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने बोडखेशी संपर्क साधला.
दोघातील चर्चेनंतर बोडखेला फिर्यादीने १ लाख ५० हजार रुपये दिले. दीड लाख मिळाल्यानंतर १५ दिवसांनी बोडखेने एवढ्या पैशात काहीच होत नाही, अजून पैसे द्यावे लागतील असे फोन करून फिर्यादीला सांगितले. तेव्हा त्यास फिर्यादीने आणखी पैसे भेटणार नाहीत, असे बजावले. त्यावर बोडखेने तुमचे पैसे परत घेऊन जा असा निरोप दिला. त्यानुसार फिर्यादी पैसे आणण्यासाठी गेल्यावर बोडखेने १ लाख रुपये दिले. ५० हजार रुपये ठेवून घेतले. त्याचवेळी तुमची कंपनी कशी चालते हेच मी पाहतो अशी धमकी दिली. या घटनेनंतर बोडखेने विविध कार्यालयात पुन्हा निवेदनांचा भडिमार केला.
दरम्यान, १२ एप्रिल २०२३ रोजी तो दुपारी कंपनीत आला. फिर्यादीला भेटल्यानंतर त्यांनी कंपनी मालकाची भेट घालून दिली. तेव्हा बोडखेने त्यांच्याकडे ४ कोटी रुपये देण्याची मागणी केली. त्याशिवाय तात्काळ ५ लाख रुपये द्यावचे लागतील आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये हप्ताही द्यावा लागेल असे बजावले. याविषयीचे संभाषण कंपनीच्या कार्यालय रेकॉर्ड झाले आहे. बोडखेच्या त्रासाला कंटाळून अखेर कंपनी व्यवस्थापनाने पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यावर कलवानिया यांनी तात्काळ खंडणीचा गुन्हा नोंदवित आरोपीस अटक केली. ही कारवाई कलवानिया यांच्या मार्गदर्शनात सपोनि भागवत नागरगोजे, उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहुल मोहतमल, कृष्णा उगले, मिलींद घाटेश्वर यांनी केली.