औरंगाबाद : सिडको बसस्थानकासमोरून टोइंग करून नेलेली प्राध्यापकाची कार सोडण्यासाठी ४०० रुपये घेऊन पावती न देणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. विशेष म्हणजे अशाच प्रकारे गाडी सोडण्यासाठी पर्यटकाकडून पैसे घेऊन पावती न देणाऱ्या एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी त्यास तडकाफडकी निलंबित केले होते. ही घटना ताजी असताना शहर पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.
शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक आई-वडिलांना सिडको बसस्थानक येथे सोडण्यासाठी रविवारी सायंकाळी कार घेऊन गेले होते. त्यांनी कार बसस्थानकाबाहेर उभी केली आणि ते आई-वडिलांच्या पिशव्या घेऊन स्थानकात गेले. त्यांना बसमध्ये बसवून ते परत आले तेव्हा त्यांची कार वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याचे समजले. त्यानंतर ते जळगाव रोडवरील सिडको वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेले. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना मुकुंदवाडी येथील एस.टी. कार्यशाळेजवळ अशा कार नेण्यात येतात. तेथे दंडाची पावती फाडून तुम्ही कार घेऊन जा असे सांगितले. प्राध्यापक रिक्षा करून वर्कशॉप येथे गेले, त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला कार सोडण्यासाठी किती दंड लागेल, याविषयी विचारले. तेथे उपस्थित हवालदार महाशयांनी कारची कागदपत्रे आहेत का, असे विचारले.
प्राध्यापकाने सर्व कागदपत्र दाखविण्याची तयारी दर्शविली. हवालदाराने त्यांना दीड-दोन हजार रुपये दंड लागेल, असे सांगितले. प्राध्यापकाने त्यांच्या ओळखीच्या पोलिसाचे नाव सांगितले, तेव्हा त्यांनी ४०० रुपये द्या आणि गाडी घेऊन जा, अशी आॅफर दिली. प्राध्यापकाने ४०० रुपये दिल्यानंतर हवालदार महाशयांनी त्यांना पावती दिली नाही. ४०० रुपये घेऊन खिशात ठेवतानाच आणि प्राध्यापकासोबतच्या संवादाचा व्हिडिओ रविवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओविषयी सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक एच.व्ही. गिरमे यांना विचारले असता त्यांनी असा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला नाही, असे नमूद करून चौकशी करतो असे सांगितले.