जालना : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्यास काम द्या, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. एन.आर. शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पी.टी. केंद्रे यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व एपीओ उपस्थित होते. जिल्हाधिकारी नायक म्हणाले की, मजुरांना काम मिळावे म्हणून मागणीनुसार नवीन कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. नवीन कामे हाती घेताना जलसंधारणाची व वृक्ष लागवडीची जास्तीत जास्त कामे सुरू करावीत. मजुरांनी केलेले अकुशल कामांची देयके त्वरीत अदा करावीत. कोणतेही अकुशल देयके प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मजुरांना मजुरी अदा करताना १५ दिवसांपेक्षा जास्त विलंब होणार नाही, विलंबास असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मजुरांना द्याव्या लागणाऱ्या विलंब आकाराची रक्कम वसूल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. मागील प्रलंबित असलेले अकुशल, कुशल देयकाचे वाटप करण्यासाठी ६०:४० कमाल चे प्रमाण राखून सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी देयके अदा करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. याबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तालुक्यात पाचसूत्री कार्यक्रमाअंतर्गत खेळाचे मैदान, अंगणवाडी, सूक्ष्म पाणलोटाची कामे, नवीन कृषी विषयक कामे व पशुसंवर्धनाची कामे इत्यादी कामांना मंजुरी द्यावी. मजुरांचे आधार कार्ड क्रमांक गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबवून आधार कार्ड क्रमांक गोळा करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी नायक यांनी दिल्या. (प्रतिनिधी)जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे आगामी काळात टंचाईजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी मग्रारोहयोची कामे मागेल त्या मजुरांना तात्काळ उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली. अकुशल व कुशल कामांबाबत देयकांचे वाटप करताना ६०:४० कमाल चे प्रमाण ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मागेल त्याला काम द्या
By admin | Published: November 07, 2014 12:28 AM