औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) तब्बल १८ लाख १६ हजार रुपयांचा निधी कंत्राटी कर्मचाऱ्याने स्वत:च्या खात्यावर वळविल्याचे उच्चस्तरीय चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्यानुसार आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सदरील कर्मचाऱ्यास दूरध्वनीवरुन संपर्क साधला व अपहार केलेली रक्कम परत ‘एनएचएम’च्या खात्यावर जमा करण्याचे सांगितले. तेव्हा ‘अगोदर तुम्ही नोटीस तर द्या, पैशाचे काय करायचे ते नंतर बघू’, हे कर्मचाऱ्याचे उत्तर ऐकूण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा पारा चढला नसेल, तर नवलच!
झाले असे, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियनांतर्गत प्राप्त निधीपैकी मागील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल १८ लाख १६ हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यावर जमा केले. आॅक्टोबर महिन्यात नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी पदभार घेतला तेव्हा त्यांना याबाबत शंका आली. त्यानुसार त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना याबाबतची कल्पना दिली. या प्रकरणात दोन कर्मचारी दोषी असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला. यानंतर कविता बनसोड व लेखापाल अजय पेरकर यांना जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले. आता या प्रकरणात दोघांनाही नोटीसा बजावणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.