- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : मंदीच्या कचाट्यात अडकलेल्या टाईनी इंडस्ट्रीजचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. त्यांना महिन्यातील १० दिवसच जॉबवर्क मिळत आहे. बाकीचे २० दिवस फक्त ‘वर्क आॅर्डर’ मिळण्याच्या प्रतीक्षेत जात आहेत. परिणामी, टाईनी इंडस्ट्रीज वाचविण्यासाठी आता ‘कोणी जॉबवर्क देता का, जॉबवर्क’ अशी याचना करण्याची वेळ सूक्ष्म उद्योजकांवर आली आहे.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद पडल्या आणि तेथील ८० कामगारांनी एकत्र येऊन टाईनी इंडस्ट्रीज उभारली. येथे ८० स्वतंत्र गाळे आहेत. पूर्वी येथे दर महिन्याला ५ कोटींची उलाढाल होत असे. मागील दोन महिन्यांपासून ‘जॉबवर्क आॅर्डर’चे प्रमाण एवढे घटले आहे की, महिन्याला फक्त १० दिवसच येथे काम होत आहे. तेही क्षमतेपेक्षा निम्मेच. यामुळे मागील महिनाभराची उलाढाल घसरून यी अवघी १ कोटीवर येऊन ठेपली आहे. कर्जाचे हप्ते तर सोडाच; पण कामगारांना पगार कसा द्यायचा, असा यक्ष प्रश्न येथील उद्योजकांना पडला आहे. येथील ८० टक्के काम हे इंजिनिअरिंग जॉबवर्क, टूलरूमचे जॉबवर्क असते. मात्र, मोठ्या कंपन्यांमध्येच मागणीअभावी, उत्पादन घटल्याने त्याचा एवढा परिणाम लघु व सूक्ष्म उद्योगांवर झाला आहे की, उद्योगांचे अर्थचक्रच कोलमडले आहे. बाजारपेठेत पैसाच फिरत नसल्याने इंडस्ट्रीवर परिणाम झाल्याचा उद्योजकांचे म्हणणे आहे.
दिवाळीनंतर परिस्थिती सुधारेल, असे उद्योजकांना वाटले होते. मात्र, परिस्थिती आणखी बिकट झाली. पूर्वी तीन शिफ्टमध्ये येथे काम होत असे. आता एक शिफ्टही चालविणे कठीण झाले आहे. कामगार रोज येतात व काम नसल्याने बसून राहतात. ‘कोणी जॉबवर्क देता का, जॉबवर्क’ असे विचारण्याची वेळ आली आहे, असे उद्योजक सांगत आहेत. आमच्या प्रतिनिधीने बुधवारी टाईनी इंडस्ट्रीजला भेट दिली व पाहणी केली, तर एकही युनिटमध्ये काम सुरू नव्हते. तेथील कामगार कधी हाताला काम मिळते, या विचारात बसले होते, तर उद्योजक टाईनी इंडस्ट्रीजच्या कार्यालयात बसून चर्चा करताना दिसून आले. काही उद्योजक जॉबवर्क मिळते का, याची विचारपूस करण्यासाठी काही मध्यम उद्योजकांच्या युनिटमध्ये गेले होते. टाईनी इंडस्ट्रीजमधील डायमेकिंग, मशिनिंग, सीएनसी मिलिंग, लेथ, फॅब्रिकेशन, ग्राइंडिंग, कास्टिंग, पॅटर्नमेकर, प्लास्टिक इंडस्ट्रीज, टूल डिझायनिंग, आॅटोमोबाईल रिपेअर्स जॉबवर्कवर परिणाम झाला आहे.
दोन महिन्यांत २५० कामगारांची कपात दोन महिन्यांपूर्वी टाईनी इंडस्ट्रीजमध्ये ५५० कामगार होते. मात्र, जॉबवर्क आॅर्डर कमी झाल्याने महिन्याला फक्त १० दिवसच काम होत आहे. बाकीचे दिवस कामगारांना बसून राहावे लागत आहे. काम मिळाले तर पहिले कच्चा माल खरेदी करावा लागतो. त्यावर जीएसटी भरावा लागतो, तसेच जॉबवर्कची रक्कम ६-६ महिने मिळत नाही. यामुळे आर्थिक चक्र बिघडले. बँकेचे हप्ते फेडणे दूरच राहिले; पण कामगारांना वेळेवर पगार देणेही कठीण जात आहे. यामुळे हळूहळू कामगारांची कपात करणे सुरू करण्यात आले आहे. २५० कामगारांना कमी केले आहे. जे कामगार सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या हातालाही काम मिळत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर युनिटला कुलूप ठोकावे लागेल. -अनिल वाघ, अध्यक्ष, टाईनी इंडस्ट्रीज
टाटा, बिर्लाएवढे उत्पन्न नाही जॉबवर्क मिळत नसल्याने माझ्याकडील ८ पैकी ४ कामगारांना कमी केले आहे. सध्या जे ४ कामगार आहेत त्यांनासुद्धा काम नसल्याने २० दिवस बसून राहावे लागत आहे. टाटा, बिर्लाएवढे आमचे उत्पन्न नाही. किती दिवस कामगारांना बसून पगार देणार. पूर्वी माझ्याकडे दोन शिफ्टमध्ये काम होत असे, आता सकाळी ८.३० वाजता यायचे व जॉबवर्क आॅर्डर मिळण्यासाठी दिवसभर वाट पाहायची. नाही मिळाली, तर सायंकाळी ५.३० वाजता युनिट बंद करून घरी जायचे. मंदीने उद्योजकांना चोहोबाजूंनी घेरले आहे. -आर.बी. सूर्यवंशी, उद्योजक, टाईनी इंडस्ट्रीज
भविष्याच्या चिंतेने उडाली अनेकांची झोप जॉबवर्कची आॅर्डर मिळत नसल्याने दिवसभर युनिटमध्ये बसून राहावे लागत आहे. आमच्या काही कामगार सहकाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. मालकाने आम्हाला कामावर ठेवले आहे. मात्र, आॅर्डरच मिळत नसल्याने मालक तरी काय करणार. सर्व कामगारांना भविष्याची चिंता लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात काय होईल, या चिंतेने अनेकांची झोप उडाली आहे. -अशोक दीक्षित, कामगार, टाईनी इंडस्ट्रीज