शिऊर / वैजापूर (औरंगाबाद) : येथे सेफ्टी टँकमध्ये संशयास्पदरीत्या २५ वर्षीय माया आगलावे या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळला होता. याप्रकरणी पती व सासूविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र, बुधवारी तपासाअंती या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सदर खून हा अनैतिक संबंधातून चुलत दीर ज्ञानेश्वर बबन आगलावे याने केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आठ वर्षांपूर्वी मायाचा विवाह शिऊर येथील दादासाहेब आगलावे याच्या सोबत झाला होता. ती पती, सासू, सात वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलासह राहत होती. दादासाहेब हा मोंढा मार्केटमध्ये मापाडीचे काम करतो, तर माया ही गावात बचत गटाचे काम करत होती. सोमवारी पती दादासाहेबने सासुला फोन करून माया गायब असल्याचे सांगितले. सासू विठाबाई कराळे यांनी मुलासह तेथे येऊन शोध घेतला असता, मायाचा मृतदेह घरामागील सेफ्टी टॅँकमध्ये आढळला. पती व सासू पैशांसाठी मायाचा छळ करीत असल्याची फिर्याद विठाबाईंनी दिल्यानंतर मंगळवारी पती दादासाहेब व त्याच्या आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी संशयित पती दादासाहेब आगलावे यास शिऊर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, मी खून केला नाही. हेच चौकशीदरम्यान तो सांगत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे शिऊर पोलिस बुधवारी ज्ञानेश्वर बबन आगलावे या तरुणापर्यंत पोहोचले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मायासोबत अनैतिक संबंध होते व ती पैसे मागत असल्याने तिला संपवल्याचे त्याने कबूल केले. आरोपी ज्ञानेश्वर याला पोलिसांनी अटक करून वैजापूर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संदीप पाटील, पोउनि. अंकुश नागटिळक, योगेश पवार, सफौ. आर. आर. जाधव, पोना. अविनाश भास्कर आदींसह कर्मचाऱ्यांनी केली.
माया आरोपी ज्ञानेश्वरला देत होती धमकीज्ञानेश्वरचे सहा महिन्यांपासून मायासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे ती ज्ञानेश्वरकडे पैशांची मागणी करायची. नाही दिले तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन, अशी धमकी ती त्याला देत होती. सोमवारी सकाळीही मायाने ज्ञानेश्वरला फोन करून २० हजार रुपये घरी घेऊन ये, असे सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर घरी आला व पैसे नसल्याचे त्याने मायाला सांगितले. तेव्हा मायाने पैसे दिले नाही, तर मी तुझी समाजात बदनामी करेन, अशी धमकी दिली. यामुळे ज्ञानेश्वरने मायाचा गळा आवळून खून केला व मृतदेह घरामागील सेफ्टी टँकमध्ये टाकून दिला.