- बापू सोळुंके
औरंगाबाद : पोलीस अधीक्षक म्हणून मी कार्यालयाची पालक असते. काम करताना एखादा अधिकारी, कर्मचारी चुकला असेल अथवा त्याने मुद्दामहून चूक केल्यानंतर त्याला चार-चौघांसमोर अथवा एकट्याला बोलावून अपमानित करण्याऐवजी त्याला नोटीस देऊन चूक सुधारण्याची संधी देण्यावर माझा भर असतो. यामुळे संबंधित व्यक्तीत सुधारणा झाली तर त्याचा लाभ प्रशासनाला होतो, असे मत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी व्यक्त केले. मोक्षदा पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’ भवनला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख म्हणून रुजू झाल्यानंतर मोक्षदा पाटील यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार मोहीम उघडली. जनावरे चोरणारी टोळी, डोंगरगाव येथील जिनिंग फोडून लाखो रुपये पळविणाऱ्या टोळीला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या कामगिरीविषयी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासंबंधी, त्यांच्या योजनांविषयी त्यांनी माहिती दिली. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतात, ही बाब लक्षात घेऊन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर लॅबचे रुपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचा शुभारंभ १५ आॅगस्ट रोजी होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यासोबतच नवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची पोलिसांना आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विविध भाषा अवगतजळगाव जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या मोक्षदा पाटील यांचे वडील ठाणे महापालिकेत शहर अभियंतापदावरून नुकतेच निवृत्त झाले. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. विविध भाषा शिकण्याची त्यांना आवड असून, त्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, ग्रीक आदी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. या भाषा येण्याचा लाभ नक्कीच होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जातीयवाद समोर आल्यास संताप येतो- सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे घरातूनच शिक्षण मिळाले. नंतर आयपीएस होऊन अंगावर पोलिसाचा युनिफॉर्म चढविल्यानंतर स्त्री, पुरुष, जात, धर्म या चष्म्यातून कोणालाही पाहू नये, यात भर पडली. असे असताना जातीयवाद पाहायला मिळाल्यास संताप येतो, असे त्या म्हणाल्या.
चुकलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारण्याची संधी- काम करताना एखादा अधिकारी, कर्मचारी चुकला असेल; अथवा त्याने मुद्दामहून चूक केल्यानंतर त्याला चार-चौघांसमोर अथवा एकट्याला बोलावून अपमानित करण्याऐवजी त्याला नोटीस देऊन चूक सुधारण्याची संधी देण्यावर माझा भर असतो. यामुळे संबंधित व्यक्तीत सुधारणा झाली तर त्याचा लाभ प्रशासनाला होतो.
एफआयआरमध्ये नाव म्हणजे गुन्हेगार नाही- पोलिसांकडे दाखल होणाऱ्या एफआयआरमध्ये (प्रथम माहिती अहवाल) आरोपी म्हणून नाव आले म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार असल्याचे सिद्ध होत नाही. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात आणि आरोपी व्यक्तींविरुद्ध सबळ पुरावा असेल, तरच त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले जाते. एवढेच नव्हे, तर न्यायालयात त्यांना दोषी ठरवले तरच ते गुन्हेगार ठरतात. हे सामान्यांना समजत नाही.
गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न- गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलिसांना सतत प्रशिक्षण दिले जाते. बऱ्याचदा पोलीस दबावापोटी गुन्हा नोंदवितात, एवढेच नव्हे तर वरिष्ठांच्या दबावामुळे म्हणा अथवा राजकीय दबावामुळे पुरावा नसतानाही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर करतात. यामुळे असे आरोपी न्यायालयातून सुटतात. पंच फितूर झाल्यामुळेही आरोपी सुटतात. हे टाळण्यासाठी आता दोषारोपपत्रांची त्रिस्तरावर पडताळणी केली जाते आणि नंतरच ते न्यायालयात पाठविण्यासारखे प्रकरण आहे; अथवा नाही, हे निश्चित होते.
अजिंठा येथे गस्त वाढविली- अजिंठा लेणीजवळच हुक्क ा पार्टी होत असल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी आपले मत काय, या प्रश्नाचे उत्तर देताना अधीक्षक पाटील म्हणाल्या की, ज्याठिकाणी हुक्का पार्टी झाली ती जमीन वन विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभागाची आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढविणार आहे. शिवाय हुक्का पार्टी करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीही स्वत: जागरूक होणे गरजेचे आहे. जनतेला जागरूक करण्यासाठी तेथे फलक लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करावे लागेल- तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन लोक गुन्हे करतात, याकडे तुम्ही कसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस अधीक्षक म्हणाल्या की, तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि यापुढेही त्यांची व्याप्ती वाढत राहील. सायबर गुन्हेगारांनी काही महिन्यांपूर्वी बँकेचा डेटा हॅक करून कोट्यवधी रुपये पळविले होते. अशा गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना अद्ययावत तंत्रज्ञान सतत अगवत करावे लागेल. पोलीस दलातील कॉन्स्टेबलही अत्यंत निष्णात सायबर तज्ज्ञ आहेत. अशा हुशार पोलिसांना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आणि अधीक्षक कार्यालयातही सतत प्रशिक्षण देत असतो. अधीक्षक कार्यालयातील सायबर लॅबचे रूपांतर ठाण्यात करण्यात आले. ग्रामीण भागातील सायबर गुन्ह्याची नोंद १५ आॅगस्टपासून सायबर पोलीस ठाण्यात केली जाणार आहे. सीसीटीएनएस क्रमांक येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.