छत्रपती संभाजीनगर: रेशनवर दिला जाणार तांदूळ ग्रामीण आणि शहरी भागातील दलालांकडून विकत घेतला जात आहे. या तांदळाच्या बदल्यात ते पैसे देतात. तर किराणा दुकानदार तांदळाच्या बदल्यात दुकानातील कोणतीही वस्तू देत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळून आले.
रेशनवर कोणाला किती मिळतो तांदूळ?देशातील कोणताही व्यक्ती उपाशी राहू नये, या कल्याणकारी भावनेने केंद्र सरकार देशातील स्वस्त धान्य दुकानामार्फत गरीब कुटुंबातील प्रतिव्यक्तीला दरमहा ३ किलो तांदूळ दोन रुपये किलो दराने मिळतो. तर पाच किलो गहू केवळ ३ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध करण्यात आला आहे. पाचजणांचे कुटुंब असेल तर त्या व्यक्तीला दरमहा १५ किलो तांदूळ मिळतो.
‘लोकमत’ने काय पाहिले?शहरातील गारखेडा परिसरातील भारतनगर वसाहतीमध्ये एक रिक्षाचालक तांदूळ आहे, का तांदूळ असे म्हणून गल्लोगल्ली फिरत होता. तो गल्लीत येऊन थांबताच अनेक घरांतील लोक त्यास कोणी दहा किलो, तर कोणी २५ किलो तांदूळ विक्री करीत होते. १२ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे तो रिक्षावाला तांदूळ विकत घेत होता.
तांदळाच्या बदल्यात किराणा सामानशहरातील विविध वसाहतींमधील किराणा दुकानदारही रेशनचा तांदूळ विकत घेऊन ग्राहकांना तांदळाच्या बदल्यात दुसरे सामान देत असल्याचे नजरेस पडले. हा दुकानदार मात्र गरिबांकडून १० ते १२ रुपये या दरानेच तांदूळ विकत घेऊन त्या बदल्यात वस्तू देत असल्याचे सदर प्रतिनिधीच्या नजरेस पडले.
इडली आणि खिचडीसाठी रेशनच्या तांदळाला मागणीरेशनवर मिळणाऱ्या तांदळाची खिचडी आणि इडली खूप चविष्ट होते. यामुळे ज्या लोकांचे रेशनकार्ड नाही, ते लोक किराणा दुकानातून रेशनचा तांदूळ १५ ते २० रुपये प्रतिकिलो या दराने विकत घेतात. शिवाय शालेय पोषण आहारातही रेशनच्या तांदळाचीच खिचडी बनविली जाते.
ब्लॅकमध्ये १२ रुपयांना खरेदी आणि २० रुपये दराने विक्रीरेशनकार्डधारकांकडून १२ रुपये प्रतिकिलो दराने खुलेआम तांदूळ विकत घेतला जातो. एका कुटुंबाला दरमहा एवढ्या तांदळाची गरज नसल्याने ते दोन ते तीन महिन्यांतून एकदा त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या तांदळाची ब्लॅकने विक्री करतात.
तत्काळ कारवाई करूरेशनवर मिळणारा तांदूळ, गहू उच्च दर्जाचा आहे. रेशनचा तांदूळ कोणी अनधिकृपणे खरेदी करू शकत नाही. अशाप्रकारे कोणी रेशनच्या तांदळाचा परस्पर साठा करीत असेल अथवा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली तर आम्ही तत्काळ कारवाई करू. मात्र, लाभार्थी का तांदूळ विक्री करतात, याविषयी आम्ही भाष्य करीत नाही.- वर्षाराणी भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी.