छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्या मंजुर कराव्यात अन्यथा आगामी निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.
शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी राजकीय भाषा करीत नाही आणि राजकारण करणार नाही. सरकारने केवळ आमच्या मागण्या पूर्ण करा एवढेच देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे. सरकारने अभ्यासकांना बोलावल्याचे सांगितले आहे. आता सरकारला कशाला अभ्यासक पाहिजे. सरळ सांगतो सरकारला अभ्यासक बोलावण्याचे नाटकं बंद करा. १३ महिने झाले सरकार अभ्यासकांशी चर्चा करीत आहेत. हा जर तुमचा ट्रॅप असेल तर सरकारला काहीही मिळणार नाही. आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत,असेही जरांगे यांनी सरकारला सुनावले.
नाईलाजाने 'आरे ला कारे करावे'मराठ्यांचे आंदोलन गोडी गुलाबीनेच हाताळा, मराठ्यांचा रोष घेऊ नका, हे पुन्हा सांगतो. नाही तर आम्हाला नाईलाजाने 'आरे ला कारे करावे' लागते असेही जरांगे यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर काल तुम्ही केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांनी शाह यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे असल्याचे उत्तर दिल्याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले की, शाह हे सूर्य आहेत का? ते केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण मला राजकीय बोलायचे नाही, असे त्यांना सांगत असल्याचे म्हणाले. पण पटेल, गर्जर आणि पाटीदार एकत्र आले तर तुमचे अवघड होईल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.