छत्रपती संभाजीनगर : समाजा-समाजांत दुही माजेल, असे वर्तन कुणी करू नये. जातीनिहाय जनगणना करून, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या-त्या समाजाला आरक्षण द्यावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे स्पष्ट केले.
मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण होता कामा नये, असे बजावत पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या वातावरणाचा लाभ सत्ताधारी उठवू इच्छित असतील तर त्यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. कारण त्यांनी सर्वांनाच आरक्षण देतो, अशा थापा मारून सत्ता हाती घेतली आणि ते कुणालाच आरक्षण देऊ शकत नाहीत, हे आता जनतेलाही समजले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू झाले पाहिजे. कारण ही सामाजिक न्यायाची भूमिका आहे, असे काँग्रेसचे मत आहे,’ असे नमूद केले. काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठकांच्या निमित्ताने ही नेतेमंडळी दुपारी पत्रकारांशी बोलत होती. जळगाव रोडवरील ‘हॉटेल एनराईज’मध्ये सकाळपासून छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीणपासून बैठकीस प्रारंभ झाला.
घराणेशाहीचा मुद्दा कालबाह्य- अशोक चव्हाणघराणेशाहीचा मुद्दा कालबाह्य झाला आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपमध्ये घराणेशाही नाही का, असा सवाल उपस्थित करून अशोक चव्हाण म्हणाले की, घराणेशाही आहे की नाही, हे लोकांना ठरवू द्या.